Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे ३१, २०२१

स्वातंत्र्यानंतर हिंदू साम्राज्य झाले असते तर आज देश जगात सर्वश्रेष्ठ ठरला असता




सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांचे प्रतिपादन

मुंबई : काँग्रेस, मुस्लीम लीग आणि ब्रिटिश यांना हिंदु साम्राज्य होऊन द्यावयाचे नव्हते. त्यामुळे त्यांनी नेहमी तशीच पूरक भूमिका घेतली होती. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि त्यावेळी जर हिंदुंचे साम्राज्य झाले असते तर जगामध्ये आपला देश श्रेष्ठ देश ठरला असता. मात्र आजही अजून वेळ गेलेली नाही. त्यासाठी हिंदु एकत्र आले पाहिजेत, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि सावरकरांचे नातूू रणजित सावरकर यांनी ऑनलाइन व्याख्यानात केले.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानमालेत ते बोलत होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार, त्यांचे द्रष्टेपण, हिंदुत्त्वाबाबत असणारा दृष्टिकोन, मुस्लीम लीगची पार्श्वभूमी, स्वतंत्र राज्यासाठी मुस्लिमांनी केलेली मागणी, खिलाफत चळवळ आणि मुस्लिमांच्या मागण्यांना महात्मा गांधी यांनी सातत्याने दिलेले समर्थन आणि पाठिंबा हा हिंदूंना कसा मारक ठरला त्याचे तपशीलवार विवेचन रणजित सावरकर यांनी व्याख्यानात केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दोन जन्मठेपांची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांना काळ्या पाण्यावर अंदमानात पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा भारतात १९२१ मध्ये पाठवण्यात आले आणि रत्नागिरीच्या तुरुंगात रवानगी केली गेली. यामुळे हे वर्ष महत्त्वाचे असल्याचे सांगत रणजित सावरकर म्हणाले की, इतिहास हा पुन्हा घडत असतो. या वर्षाच्या महत्त्वाच्या निमित्ताने आपल्याला पूर्वीच्या सर्व बाबींना आठवत नव्याने पावले टाकायची संधी मिळालेली आहे. हिंदुना या निमित्ताने एकत्र आणण्याची ही बाब आहे.
या व्याख्यानात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विविध प्रसंगात जी जी भूमिका मांडली, जे जे धोक्याचे इशारे दिले, जे मार्गदर्शन केले ते द्रष्टेपणाचे होते, त्याबद्दल रणजित सावरकर यांनी विविध घटनांचा संदर्भ घेत माहिती दिली. विद्यार्थ्यांसमोर आपणला ही माहिती देताना विशेष आनंद होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुस्लिमांना स्वतंत्र राज्य हवे आणि ती संकल्पना सय्यद अहमद यांनी मांडली ती १८८३ मध्येच. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मही झाला नव्हता. मुस्लीम लीगची स्थापना झाली त्यानंतर सुधारणांद्वारे मुस्लिमांना सवलती दिल्या गेल्या. खिलाफत चळवळीबद्दल तीव्र टीका करीत रणजित सावरकर म्हणाले की, यामागे गांधी यांनी वैयक्तिक पाठिंबाही दिला आणि ते त्या चळवळीचे भारतातील अध्यक्षही होते. १९२१ मध्ये या खिलाफतीला काँग्रेसनेही पाठिंबा दिला आणि त्याचे परिणाम हिंदुंनी भोगले. मुसलमान आमच्याबरोबर असला पाहिजे, या गांधींच्या हट्टासाठी मुस्लिमांचे लांगूलचालन तेव्हापासून केले गेले. सावरकर यांनी खिलाफतीबाबत तीव्र टीका केली.
केरळमध्ये खिलाफतीच्या पार्श्वभूमीवर तेथील मोपला मुसलमानांनी हिंसाचार अत्याचार करून हिंदूंच्या कत्तली केल्यास, बलात्कार केले. तेथे त्यांना अटकाव करण्यासाठी ब्रिटिशांंनी लष्करी कारवाई केली. त्यानंतरही मोपला मुसलमानांनी कृत्यहे जोशात केले मात्र ते मनाने सच्चे आहेत, अशी भलावण गांधींनी या मोपला मुसलमानांची केली.
अब्दुल बारी या एका मुस्लीम धर्मगुरूने फतवा काढला आणि मुसलमानांची पवित्रभूमी भारत नाही ती अफगाणिस्तान आहे असे सांगत तेथे जाऊ, असे त्यांनी मुसलमान भारतीयांना सांगितले. धर्माच्या या आधारानुसार तेथे १८००० मुसलमान भारतातून गेले. मात्र गांधीनी त्यांना रोखले नाही. तर ते म्हणाले की, मुसलमानांचा जेथे अपमान होतो ते तेथे राहात नाहीत. हे चांगले आहे. म्हणजे एक राष्ट्राचा आधार त्यांना तेथे होता आणि त्याचे समर्थनच गांधीनी केले होते. यामुळे त्यातूनच मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीला समर्थनच मिळाले.
खिलाफतीच्या आंंदोलनाची तुलना रणजित सावरकर यांनी सीएए विरोधी आंदोलनाशी करीत भारतातील मुसलमानांना वास्तविक काही देणे घेणे नसूनही त्यांनी सीएए विरोधात आंदोलन केले कम्युनिस्ट आणि काँग्रेसने त्यांचे स मर्थन केले. १९२० मध्ये मुस्लीम संख्या २२ टक्के होती. १९४७ मध्ये ती ३५ टक्के झाली आणि विभाजन झाले आजही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आणि विभाजन टाळण्यासाठी सावरकरांच्या विचारांची गरज आहे. हिंदुंनी एकत्र होण्याची गरज आहे.
विविध विषय उलगडत स्वातंत्र्यानंतरच्या परिस्थितीची तुलना करीत यावेळी रणजित सावरकर यांनी हिंदुंविरोधी विविध बाबींवर आसूड ओढले आणि हिंदूंना एकत्र येऊ द्यायचे नाही, असाच हेतू यामागे असून हिंदूंच्या स्वसंरक्षणासाठी शस्त्रे हाती घेण्याची गरज आहे आणि हिंदूंना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे बाळगण्यासाठी अर्ज करावेत १८६० चा शस्त्रबंदीचा कायदा ब्रिटिशांंचा होता मात्र काँग्रेसने त्यावेळी विरोध केला तरी स्वातंत्र्यानंतर तो बदललाही नाही. मात्र आजी ही गरज ओळखून हिंदूंनी अर्ज करावेत. त्यासाठी आम्हीही आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. व्याख्यानात नेहरूंची धूर्त नीती, काँग्रेसचे धोरण आणि त्यांच्या नेत्यांनी केलेल्या कृतींना उघड करीत हिंदूंबाबतच्या त्यांच्या कृत्यांवर कडाडून टीका केली.
व्याख्यानाच्या अखेरीस विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन व्याख्यानाला आवर्जून उपस्थिती नोंदवली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.