Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे ०२, २०२१

ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून महानिर्मितीची ‘मिशन ऑक्सिजन’ मोहीम युद्धपातळीवर




मुंबई:- दि २ मे: राज्यातील कोविड साथीच्या संकटाने उग्र अवतार धारण केला असताना व सर्वत्र ऑक्सिजनची टंचाई जाणवत असताना देशात सर्वत्र ऑक्सिजन विषयी हाहा:कार माजला असल्यामुळे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली महानिर्मिती व्यवस्थापनाने तातडीने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून अंमलबजावणी देखील सुरू केली आहे.

त्यानुसार सध्या महानिर्मितीच्या खापरखेडा,कोराडी,पारस व परळी या वीज केंद्रांमधील ओझोनायझेशन प्लांट मधून त्या-त्या परिसरातील गंभीर कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजनचा पूरक पुरवठा करण्यासाठी अतिशय गतिमान पावले उचलली जात आहेत. या वीज केंद्रांद्वारे वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा साध्य होणार आहे.

एकीकडे कोरोनाच्या आव्हानात्मक काळात महानिर्मिती सातत्यपूर्ण वीजनिर्मिती साध्य करत असल्याने अश्या आपत्कालिन परिस्थितीत राज्याला पुरेशी वीज उपलब्ध होत आहे. पण केवळ तेव्हढ्यावरच न थांबता

सध्यस्थितीत महानिर्मितीच्या काही वीज केंद्रातील ओझोन प्लांट मधून परिसरातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करण्यासाठी महानिर्मितीने कंबर कसली आहे.औष्णिक वीज केंद्रात वापरल्या जाणाऱ्या पाण्यात शेवाळ-सूक्ष्मजंतू होऊ नयेत यासाठी त्या पाण्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी ओझोनायझेशन प्लांट स्थापित केलेले असतात. वीजनिर्मितीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन अश्या प्लांट मधून काही अतिरिक्त यंत्रणा उभारून किमान ९५ टक्के शुद्धता राखून पूरक वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते याचा साधकबाधक अभ्यास करून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे मार्गदर्शनाखाली आणि महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांचे नेतृत्वाखाली महानिर्मितीची संपूर्ण यंत्रणा गतिमानतेने कामाला लागली असून महानिर्मितीचे वरिष्ठ व्यवस्थापन- अधिकारी-कर्मचारी जणू कोविड योद्धा बनून या कार्यात अविश्रांत परिश्रम करत आहेत.

याबाबतचे नुकतेच प्राप्त झालेले राज्य शासनाचे तातडीचे निर्देश व ही संकल्पना यशस्वी करण्यासाठीची प्राथमिक तांत्रिकी व प्रशासकीय शक्यता तातडीने तपासून आता महानिर्मितीने एकूण तीन स्तरावर सूक्ष्म नियोजनाद्वारे प्रत्यक्ष कार्यवाही युद्धपातळीवर सुरू केली आहे.

पहिल्या टप्प्यात महानिर्मितीच्या नवीन परळी वीज केंद्राने अवघ्या काही दिवसांत तातडीने युद्ध पातळीवर अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाला प्रतिदिन २८८ जम्बो सिलेंडर क्षमतेचा व ९५.२ टक्के शुद्धतेचा ऑक्सिजन प्लांट उभारला. हा प्लांट २७ एप्रिल रोजी कार्यान्वित केल्याने परळी -बीड परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. तसेच आता प्रति तास ८४ घनमीटर क्षमतेचा अशाच प्रकारचा प्लांट परभणी जिल्हा परिषद कोविड रुग्णालय येथे देखील उभारला जात असून तो पुढील आठवड्यात कार्यान्वित होणार आहे. अशा प्रकारे मराठवाडा या मागास प्रदेशात महानिर्मितीचे फार मोठे काम सुरू झाले आहे.

पहिला टप्पा तातडीने मार्गी लावल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात आता खापरखेडा व पारस वीज केंद्रातील सध्यस्थितीतील ओझोनायझेशन प्लांट नजीकच्या शासकीय रुग्णालय परिसरात स्थलांतरित करून तिथून ऑक्सिजन निर्मिती साध्य केली जाणार आहे. खापरखेडा वीज केंद्राद्वारे प्रति तास ४२ घनमीटर या क्षमतेने आणि पारस वीज केंद्राद्वारे प्रति तास ५० घनमीटर या क्षमतेने ऑक्सिजन पुरवठा साध्य केला जाणार आहे. याविषयक वेगवान हालचाली करून अश्या गंभीर परिस्थितीत कोणतीही दप्तर दिरंगाई होणार नाही व पुढील येणाऱ्या कोरोना लाटेत आपल्या राज्यातील लोकांना केवळ ऑक्सिजन अभावामुळे मृत्यू येऊ नये. याची पूर्ण खबरदारी घेऊन महानिर्मितीने आगामी एक ते दीड महिन्यातच या ऑक्सिजन प्लांटची उभारणी पूर्ण व्हावी यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.

तसेच कोराडी(नागपूर), पारस(अकोला) व परळी (बीड) येथे वीज केंद्र परिसरातच रिफिलिंग/बॉटलींग प्लांट उभारून ऑक्सिजन सिलेंडर निर्मिती साध्य करणे हा नियोजनाचा तिसरा टप्पा असणार आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त आवश्यक ते कॉम्प्रेसर्स ,फिल्टर्स व इतर अत्यावश्यक यंत्रसामुग्री तातडीने विदेशातून आयात/देशांतर्गत उपलब्ध करून हा टप्पा साकार केला जाणार असून महानिर्मितीची यासंबंधी प्लांट उभारणीची व आगामी वर्षभर त्याच्या सुरक्षित देखभाल दुरुस्तीसाठीची प्रक्रिया सुरु आहे. या टप्प्यातून कोराडी वीज केंद्राद्वारे दररोज तब्बल १००२ जम्बो सिलेंडर्स, पारस वीज केंद्राद्वारे प्रतिदिन १२८ सिलेंडर्स, परळी वीज केंद्राद्वारे २१६ सिलेंडर्स एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती साध्य करण्यात येईल. तथापि या सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन वीज केंद्रातील ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यासाठी नियोजनानुसार आवश्यक कालावधी हा लागणारच आहे.


आगामी काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन शासन निदेर्शानुसार त्यासाठीच्या पूर्वतयारीचा हा भाग समजून महानिर्मितीने हा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे.


औष्णिक वीज केंद्र परिसरातील धुळीकणांचे प्रमाण व तापमान लक्षात घेता वीज केंद्र परिसरात कोविड सेन्टर उभारणे संयुक्तिक ठरणार नाही हे वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन आता महानिर्मितीने वरीलप्रमाणे सुधारित नियोजन केले आहे.




महानिर्मिती मधील ओझोनायझेशन प्लांट मधून ऑक्सिजन निर्मितीची क्षमता लक्षात घेता ऊर्जा विभागाच्या या सर्व प्रयत्नातून राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकतो, असा आशावाद ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे. महानिर्मितीच्या या एकूणच तत्पर प्रतिसादाबद्धल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संपूर्ण महानिर्मिती टीमचे कौतुक केले आहे.




तद्वतच महानिर्मितीची सामाजिक बांधिलकी म्हणून

महानिर्मितीच्या खापरखेडा वीज केंद्राने ३० एप्रिल रोजी सामाजिक जाणिवेतून स्वत:च्या मालकीचे २५ ऑक्सिजन सिलिंडर कोरोना रुग्णांसाठी जिल्हाधिकारी भंडारा यांना दिले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.