आमदार कांबळे यांच्या त्या धमकीचा वैद्यकीय अधिकारी संघटनेकडून निषेध व कारवाईची मागणी
24 तासाच्या आत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.11मे :-
पुलगाव देवळी मतदारसंघाचे आमदार रणजित कांबळे यांनी 9 मेला जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्यामुळे,त्यांना 24 तासात अटक न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट(अ) संघटनेच्या गोंदिया शाखेच्या वतीने नामदार नवाब मलिक पालकमंत्री गोंदिया, जिल्हाधिकारी गोंदिया, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांना 10 मे रोजी दिलेल्या निवेदनातून दिला आहे. दिनांक 9 मेला देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांना मोबाईल वरून अश्लील शिवीगाळ करून, अपमानास्पद भाषेचा वापर करत, जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा संघटनेने तीव्र निषेध केला आहे. जिल्हा गोंदिया अंतर्गत सडक अर्जुनी कोविड केअर सेंटरमध्ये सुद्धा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भुते यांना मारहाण करण्यात आली होती. त्याबरोबरच मौजा चौपा येते कोविड कार्य पथक मधील आशा व आरोग्य सेविका लसीकरणा करता घरोघरी लाभार्थी बोलविण्याचे कार्य करीत असता, त्यांच्यावर देखील काही दिवसांपूर्वी हल्ला करण्यात आला होता. अशा घटना वारंवार घडत असल्याने जिल्हा गोंदिया अंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य यंत्रणेचे मानसिक खच्चीकरण होत आहे. आता आरोग्य यंत्रणेच्या अधिकारी-कर्मचार्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. असेही निवेदनात म्हटले आहे. अशा वातावरणात काम करण्यास मानसिक बळ मिळावे या उद्देशाने दोषीवर तात्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे. वर्धा येथे घडलेल्या प्रकाराचा तीव्र निषेध करीत, जर आरोपीला 24 तासात अटक न झाल्यास अत्यावश्यक सेवा वगळता कोविड व नॉन कोविड रुग्णसेवा पूर्णतः बंद करून, काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय राज्यभरातील मॅगमो (MAGMO) संघटनेने घेतला आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून, गोंदिया जिल्ह्यात सुद्धा काम बंद आंदोलन करण्यात येईल. असा इशारा गोंदिया शाखेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन चांदेकर सचिव डॉक्टर वेद प्रकाश चौरागडे व पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.