वणवा लागलेल्या आगीत जखमी वनमजूराचा उपचारादरम्यान मृत्यू
एक महिना नऊ दिवस मृत्यूशी झुंज.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.19 मे:-
नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा व पिटेझरी येथील कम्पार्टंमेंट क्र.९७,९८,९९,१०० या परिसरात ८ एप्रिल २०२१ ला सकाळी ११ वाजेदरम्यान आग लागली होती. सदर आग आटोक्यात आणण्याचे काम वनमजूर करीत होते. आग आटोक्यात आली पण सायं.४ ते ५ वाजेदरम्यान सोसाट्याचा वारा आला आणि आगीने रौद्ररूप धारण केले.आग विझविणाचा प्रयत्न वनमजूर करू लागले.पहाडी क्षेत्रात आग लागल्याने वनमजूर फसले.परंतु आग विझविण्यातांना आगीने तीन वनमजूरांचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता.तर दोन वनमजूर गंभीर जखमी झाले होते.त्यांना उपचारासाठी नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर दोन्ही जखमी वनमजूरांचा उपचारांचा खर्च शासनाकडून करण्यात येत आहे.जखमी वनमजूरापैकी थाडेझरी येथील विजय तिजाब मरस्कोल्हे वय ४२ वर्षे यांचे १७ मे ला रात्री ९.३० ते १० वाजेदरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झाले.
नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रात अज्ञात इसमाने लावलेल्या आगीत मृत्यू झालेल्या तीन वनमजूरांच्या कुटूंबांना शासनाने व वन्यजीव विभाग तसेच एनजीओ मार्फत आर्थीक मदत करण्यात आली होती ,तीच मदत उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या थाडेझरी येथील विजय तिजाब मरस्कोल्हे यांचे कुटूंबांना देण्यात यावी.अशी मागणी मृत कुटूंबाकडून करण्यात येत आहे.
नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रात नेमकी आग कशामुळे लागली? कुणामुळे लागली? याचा उलगडा अजूनपर्यंत झाला नाही.कोणत्या अज्ञात व्यक्तींने आग लावली याची वन्यजीव विभागाकडून अजूनही चौकशी करण्यात आली नाही.तसेच या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाल्याचे दिसत नाही.आज उपचारादरम्यान थाडेझरी येथील वनमजूराचा मृत्यू झाला असून गावात तणाव निर्माण होऊ नये. कोणतीही अप्रिय घटना होऊ नये, म्हणून वन्यजीव विभागाने पोलीस विभागाला पाचारण करून पोलीस तैनात केले आहेत.पण या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिका-यांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस वन्यजीव विभागाकडून दाखविण्यात आले नाही.