पोलीस पाटलांची विमा संरक्षणाची मुदत अखेर जून २०२१ पर्यंत वाढली
पोलीस पाटील संघटनेने मानले आभार.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.19 मे:-
कोविड-१९ कोरोना संक्रमण काळात कर्तव्य बजावित असतांना कोविड आजाराने मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांना विमा संरक्षण कवचाची मुदत पोलीस पाटील संघटनेच्या सतत पाठपुरावा नंतर अखेर जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे, त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे वित्त विभाग, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील,खा.प्रफुल पटेल,आ. मनोहर चंद्रीकापूरे यांचे महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार आरोग्य सेवा कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त पोलीस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी,मानसेवी पोलीस पाटीलसह सर्वेक्षण,शोध,माग काढणे, प्रतिबंध,चाचणी, उपचार व मदतकार्यात गुतंलेल्या कर्मचा-यांना मृत्यूच्या प्रकरणी ५० लाख रुपये रकमेचे विमा संरक्षणाची मुदत डिसेंबर २०२० पर्यंत करण्यात आली होती.परंतू त्यानंतर राज्यात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट येऊन रूग्ण संख्येत दुपटीने वाढ होऊन सुद्धा विमा संरक्षणाची मुदत वाढविण्यात आली नव्हती.यादरम्यान सन २०२० ला २० पोलीस पाटील व सन २०२१ ला आजपर्यंत १७ पोलीस पाटीलांचा मृत्यू झाला.त्यामुळे महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने सतत गृहमंत्रालय,खा.प्रफुल पटेल,आ. मनोहर चंद्रीकापूरे यांना वेळोवेळी निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्याला त्यांनी नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.अखेर १४ मे २०२१ च्या शासन परिपत्रकानुसार विमा संरक्षणाची मुदत जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आली. यादरम्यान कोरोना संक्रमीत झालेल्या पोलीस पाटीलांसह सर्व फ्रंट लाईन कर्मचा-यांच्या झालेल्या वैयक्तिक खर्च शासनानी देण्याची तरतूद करावी, आणि विमा संरक्षणाची मुदत डिसेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी पोलीस पाटील संघटनेने केली आहे.शासनाने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, दिलीप मेश्राम गोंदिया,शरद ब्राम्हणवाडे गडचिरोली, सुधाकर साठवने भंडारा,विजय घाटगे नागपूर, राजेश बन्सोड,श्रीराम झिंगरे, नंदाताई ठाकरे, रमेश टेंभरे यांनी केले आहे.