Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे ०९, २०२१

धुर्वीकरणाचे राजकारण...

पाच राज्यात निवडणुका झाल्या.  बऱ्याच गाजल्या. दोन मे रोजी निकाल लागले. ते बोलके निघाले. 822 जागा होत्या. त्यापैकी 115 जागांवर मुस्लिम विजयी झाले. भाजपचे धुर्वीकरणाचे राजकारण. उच्च जाती एकत्र येतात. त्याला तसेच उत्तर मिळाले.शिया-सुन्नी भेद विसरले. उत्तर ते दक्षिणे पर्यंतचे पाच राज्य ढवळून निघाले. मुस्लिम  निर्णायक ठरले.  


बंगालची निवडणूक गाजली. निकालानंतर दंगलीकडे वळली. निकालाची चर्चा त्यात विरली. तरी विधानसभा पाच वर्ष  गाजत राहील. बलाबल त्याला खतपाणी देत राहील.  भाजपने 77 जागा जिंकल्या.  मुस्लिम  एकही नाही. उलट तृणमूलने 44 मुस्लिम उमेदवार दिले. त्यापैकी 43 विधानसभेत पोहचले. केवळ एक हरला. त्या जागेवर सेक्यूलर मजलिस पार्टीचा उमेदवार विजयी झाला. हिंदु, मतुआ, आदिवासी मतं भाजपसोबत आहेत. हे दावे  होते. मीडियावरून बिंबविले जात होते. दीड-दोन महिने आलटून पालटून ही टेप वाजत होती. ते सर्व जुमले निघाले. सुमारे 70 टक्के हिंदु असलेल्या मतदार संघात ममताचे अनेक उमेदवार विजयी झाले. मोदी- शहा जोडीला हा झटका  होता. छातीठोकपणे दोनशे पार म्हणत होते. त्याबाबत चिमटे काढणे सुरु आहे. त्यावर मौन आहे. या राज्यात मुस्लिमांची 28 टक्के लोकसंख्या आहे.

  

आता सशक्त विरोधी पक्षाचे दावे आहेत. ते अर्थहीन ठरतील. तृणमूलकडे  बरेच तरूण चेहरे आहेत. जोडीला 43 मुस्लिम आमदार.   हे बळ विरोधी पक्षाला मर्यादेत राहा. हे सांगण्यास समर्थ आहे. असरुद्दीन ओवेशी जोशात होते. खर्चही बराच केला. इथं त्यांची दाळ शिजली नाही. तसेही त्यांच्यावर पुरस्कृतचा ठपका आहे. बंगालमध्ये जाती,जमातीची लोकसंख्या 24 टक्के आहे.त्यात मतुआ समाज 50 टक्के. त्या समाजाला भाजपने खूप गोंजरले. आरएसएसचे आदिवासींमध्ये काम. भाजपने या  समुदायांत खूप भोजनसत्र चालविले. या दोन्ही समाजांचा प्रभाव असलेल्या 74 जागांपैकी 44 जागा तृणमूलने जिंकल्या. मुस्लिम समाज 100 जागा प्रभावित करतो. ही गठ्ठा मतं तृणमूलकडे गेली. त्यामुळे 213 जागांचा पल्ला गाठता आला. त्यापुढे भाजपचा जयश्रीराम टिकला नाही. पराभव पत्करावा लागला. आस्था मतांच्या बाजारात आणणे. ही भाजपची घोडचूक. तिची चटक उत्तर प्रदेशापासून लागली. ती प. बंगालात नडली. अर्थव्यवस्था ढासळली. महागाई वाढली. नोकऱ्या घटल्या. त्यावर उपाय नाही. पडदा टाकण्यास आस्थेचा मारा. याचा अर्थ चटके बसणाऱ्यांना कळला. त्यांनी बडगा उचलला. त्याचा मार संघ-भाजपला  निकालातून कळला.


तामीळनाडूत द्रविडी विजय 


तामीळनाडूत पेरियार  यांच्या आंदोलनातून डीएमके पक्ष जन्मास आला. या पक्षाचा सामाजिक न्यायावर भर . करूणानिधी यांच्या निधनाने नेतृत्वाची पोकळी वाढली. भाजपने हे नेमके हेरले. एआयडीएमकेला हाताशी धरले.  धार्मिक कट्टरतेच्या माध्यमातून डीएमकेला घेरण्याचे ठरले. प्रयत्न केला. तो टिकला नाही. उलट एआयडीएमकेच्या भाजपमैत्री अंगलट आली. केवळ 66 जागा मिळाल्या. तर भाजपला चार जागा. एकट्या डीएमकेने 133 जागा जिंकल्या. काँग्रेसला 18 जागा मिळाल्या. डीएमकेने आपल्या घोषणा पत्रात आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यांच्या मुलांना आरक्षण लागू करण्याची घोषणा केली. यावरून  सामाजिक न्यायावर किती भर आहे. हे लक्षात येते.या पक्षाचा जाती, जमाती, अल्पसंख्याक हा आधार आहे. तो आणखी घट्ट केला. या विधानसभेत सात मुस्लिम उमेदवार विजयी झाले.

आसाममध्ये भाजपने आपली सत्ता कायम राखली.एनडीएला 75 जागा . तर युपीएला 50 जागा मिळाल्या. भाजप बाराही महिने सीएए व नागरिकता कायदा लागू करू  सांगत होती. निवडणनकीत यावर मौन पाळले. कॉग्रेस या मुद्द्यावर प्रचारात आक्रमक राहिली. त्याचा उत्तर आसामात फटका बसला.  मुस्लिम 31 उमेदवार विजयी झाले. त्यात 16 काँग्रेसचे व  बदरूद्दीनच्या पक्षाचे 15 आहेत. हे युपीए आघाडीतील आहेत. या आघाडीचे 50 आमदार निवडून आले. एक अपक्ष जेलमधून निवडून आला. त्याला भाजप सरकारने देषद्राेहाच्या आरोपाखाली अटक केली आहे. काश्मीर नंतर सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या आसामात आहे. 34  टक्के मुस्लिम आहेत.भाजपचा एकही मुस्लिम उमेदवार विजयी झाला नाही.


जावई- सासरा विधानसभेत


 केरळ विधानसभेत सासरा व जावई दिसेल. सासरे मुख्यमंत्री पिनराई विजयन व जावई मोहंमंद रियाज आहेत. रियाज  मुख्यमंत्र्यांची मुलगी  विणा यांचे पती आहेत. रियाज यांच्यासह 32 मुस्लिम आमदार दिसतील. पांडेचरीत 1 मुस्लिम आमदार दिसेल. भाजपच्या वाढत्या धर्माधंतेच्या विरोधात मुस्लिम मतदार संघटितपणे आपली मते टाकत आहे. त्याचा फायदा जिंकू शकतील अशा पक्षांना मिळत आहे. हा फायदा प. बंगालात तृणमूलला मिळाला. त्यामुळे ममता दिदींना जयश्रीरामच्या लाटेला सहज रोखता आलं. हा एेक्यभाव ओबीसी, जाती, जमातीत जागेल. तेव्हा राजकारणात मोठा बदल दिसेल.

- भूपेंद्र गणवीर

...................BG.....




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.