मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
राजुरा / प्रतिनिधी
कोरोनाची दुसरी लाट जीवघेणी ठरली असुन या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असुन रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात सर्वाधिक कमतरता जाणवत आहे ती म्हणजे रेमेडीसीवीर लस आणि ऑक्सिजनचा. सध्या रुग्णांच्या श्वासनसंस्थेवर परिणाम होत असुन बर्याच रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा व कित्येकदा व्हेंटीलेटरची सुद्धा निकड भासत आहे. सध्या देशभरात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असुन राज्य तसेच जिल्ह्यातही ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राजुरा नगर परिषदेने तत्परतेने पावले उचलली असुन शहरात ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना प्रस्ताव सादर केला आहे.
प्रस्तावाची माहिती देताना नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सांगितले की शहरात कोरोना रुग्णांच्या उपचार व देखभालीसाठी मिळुन जवळपास १५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन खाटांची व्यवस्था आहे. भविष्यात आवश्यकतेनुसार यात वाढ करण्याची गरज पडल्यास रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणुन राजुरा नगर पालिकेने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला असुन जवळपास १ कोटी १९ लाख ८० हजार ६५८ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सदर खर्चाला तसेच ऑक्सिजन प्लांट उभारणीस मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव देण्यात आला असुन लवकरात लवकर सदर प्रकल्प पुर्ण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 चे कलम 93(8) अन्वये विना निविदा ह्या प्रकल्पास मान्यता व मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे.