Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे ०२, २०२१

गंभीर रुग्णांसाठी 4 मेपर्यंत ऑक्सिजनयुक्त बेड व व्हेंटिलेटर्स उपलब्ध करा; अन्यथा 5 मे पासून उपजिल्हा रुग्णालयासमोर उपोषण



माजी आमदार सुदर्शन निमकर यांचा इशारा

राजुरा/ प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्हयासह राजुरा , कोरपना , जिवती व गोंडपिपरी तालुक्यात कोरोणा महामारीची स्थिती बिकट झाली आहे . वैद्यकिय सुविधा सुध्दा अपु-या पडत आहेत . व्हेंटिलेटर्स अभावी कोरोना बाधित रुग्ण मृत्यू पावत आहे. उपजिल्हा रुग्णालयात अद्यावत व्यवस्था नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. याकरिता प्रशासनाने तात्काळ 50 ऑक्सिजनयुक्त बेड व गंभीर रुग्णांसाठी वेंटिलेटर्स उपलब्ध करून, संकट काळात नागरिकांचे जीव वाचवावे अन्यथा ५ मे पासून उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड केंद्रासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दिलेला आहे.

याबाबत 30 एप्रिल रोजी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्हा प्रशासन व स्थानिक संबंधित अधिकाऱ्यांना मागणीची पूर्तता न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याबाबत निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे. राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या कोविड विभागात मृत्यूचे प्रमाण लक्षणिय वाढत आहे . येथील कोविड रुग्णालयात एकूण 46 बेड असून त्यापैकी फक्त 23 बेड हे ऑक्सीजन युक्त आहे .अपुऱ्या ऑक्सीजन बेड मुळे रुग्णांना मृत्यू च्या दारात ढकलल्या जात आहे. कोविड केंद्रावर भरती होत असलेल्या रुग्णांची ऑक्सीजन लेवल 90 च्या खाली 65 पर्यंत जात असल्यामुळे त्यांना व्हेंटीलेटर बेड ची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे . ज्या रुग्णांची ऑक्सीजन लेवल 90 च्या खाली आहे अशा रूग्णांना व्हेंटीलेटर सुविधेसाठी भरती करण्यासाठी चंद्रपूर ला रेफर करण्यात येत आहे परंतू चंद्रपूर मध्ये सुध्दा व्हेंटीलेटर बेड खाली नसल्यामुळे अशा रुग्णांना उपचाराअभावी नाईलाजाने जीव गमवावा लागत आहे. गंभीर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सीजन मिळावे म्हणून लगतच्या तेलंगणा राज्यात सुद्धा नातेवाईक रुग्णांना घेऊन जात आहेत. मात्र वेळीच उपचार मिळत नसल्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. ही अत्यंत मन हेलावून टाकणारी गंभीर अशी बाब आहे . उपजिल्हा रुग्णालयातील अपु-या व्यवस्थेमुळे अनेक रुग्ण रुग्णालयात न येता खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेत असून मोठया प्रमाणात अशा रुग्णांचा मृत्यू सुध्दा होत आहे . अशा रुग्णांच्या मृत्यूची नोंद कोविड रुग्णाच्या शासकीय यादी मध्ये करण्यात येत नाही . परंतू ही संख्या शासकीय यादीच्या कितीतरी पटीने जास्त असण्याची शक्यता आहे . या गंभीर प्रश्नाकडे आरोग्य प्रशासनाचे व जिल्हा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे . या संबंधाने संबंधितांकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत . परंतू वेळीच लक्ष देउन या ठिकाणी व्हेंटीलेटर्स चे बेड व रुग्णसंख्येनुसार पुरेसे ऑक्सीजन बेड उपलब्ध नसल्यामुळे परिसरातील कोविड रुग्णांचा नाहक मृत्यू होत आहे. कोविड रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा देण्यासाठी ४ मे पर्यंत प्रशासनाने उप जिल्हा रुग्णालयामध्ये 50 ऑक्सीजन बेड व वेंटिलेटर्स तात्काळ उपलब्ध करावे अशी विनंती केलेली आहे.


परिसरात असलेले अल्ट्राटेक सिमेंट , मानिकगड सिमेंट , अंबूजा सिमेंट, दालमिया सिमेंट व कोळसा खाणी उद्योगाच्या सामाजिक दायीत्व निधीमधून कोरपना त गोंडपिपरी तालुक्यातील मोठया मंगल कार्यालयात जंबो कोवीड सेंटर उभारावे ज्यामुळे रुग्णांना तात्काळ इलाज मिळेल. प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी व रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. संकट काळात स्थानिक उद्योगानी कोवीड रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी पुढे यावे असे आवाहन माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केलेले आहे. वर उल्लेखित अत्यंत आवश्यक समस्यांची पूर्तता येत्या 4 मे पर्यंत पूर्तता न केल्यास जनतेच्या हितासाठी कोणत्याही कारवाहीची पर्वा न करता दि.5 मे 2021 पासून मागण्याच्या पूर्ततेसाठी बेमुदत उपोषण करणार असल्याचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी निवेदन देऊन जाहीर केलेले आहे.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.