अँटीजन व आरटीपीसीआर व्हि.टी.एम. किटचा मुबलक पुरवठा करा
महापौर राखी कंचर्लावार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चंद्रपूर, ता. २८ : सध्या कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत अँटीजन व आरटीपीसीआर चाचणी केंद्र उभारुन मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात अँटीजन व आरटीपीसीआर किटची आवश्यकता आहे. त्यामुळे महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी अँटीजन व आरटीपीसीआर व्हि.टी.एम. किटचा मुबलक पुरवठा करण्याची मागणी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे केली. यासंदर्भात महापौरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांची उपस्थिती होती.
सध्या कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत अँटीजन व आरटीपीसीआर चाचणी केंद्र उभारुन मोठ्या प्रमाणात चाचणी करण्यात येत आहे. परंतु, अँटीजन टेस्ट किटचा पुरवठा अत्यल्प असून, त्याचे दर पूर्वीच्या दराच्या तुलनेत दुपट्टीने वाढलेले आहेत. परंतु, कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिनांक २३/१७/२०२१ ला हे दर रु. ५६/- प्रमाणे होते. व सद्यस्थितीत रु. ११०/- ते १२० प्रमाणे आहे. हे दर खुप जास्त प्रमाणात वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे अँटीजन टेस्ट किटचा तुटवडा होत आहे. सदर 'किटच्या पुरवठ्यासाठी ऑर्डर दिले आहे. परंतु जोपर्यंत पुरवठा होत नाही तोपर्यंत आम्हाला उपरोक्त किट आपल्या मार्फत चंद्रपूर शहर महानगरपालिकेला पूर्वीच्या दराप्रमाणे पुरविण्यात याव्यात, अशी मागणी महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केली आहे.
महापौरांनी निवेदनात म्हटले आहे की, आरटीपीसीआर (व्हि.टी.एम. किट) ची संख्या ही अत्यंत कमी असल्यामुळे आम्हाला सदर किटचा पुरवठाही आपल्या मार्फत वाढविण्यात यावा. कारण कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांची चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे. करीता जोपर्यंत आम्ही दिलेले अँटीजन टेस्ट किटचा ऑर्डर येत नाही, तोपर्यंत आपल्यामार्फत अँटीजन टेस्ट किटचा तसेच आरटीपीसीआर (व्हि.टी. एम. किट)चा पुरवठ्यामध्ये वाढ करुन सदर पुरवठा लवकरात लवकर करण्यात यावा. जेणेकरुन नागरिकांची चाचणी करण्यास सोईचे होईल. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असेही महापौर राखी संजय कंचर्लावार म्हणाल्या. निवेदन देतेवेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांची उपस्थिती होती.