कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ आवश्यक
Ø राज्य शासनाच्या निर्देशाचे नागपूरमध्ये काटेकोर पालन करा
नागपूर दि 6: राज्यशासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नव्याने काढलेले निर्णय स्वयंस्पष्ट आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी पुढील काळात कडक निर्बंध पाळणे गरजेचे आहे. नागपूर शहरातील उद्रेक लक्षात घेता प्रशासनापासून तर सामान्य नागरिकांपर्यंत दुकानदारापासून तर फेरीवाल्यांपर्यंत सर्वांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले आहे.
4 एप्रिल रोजी ‘ब्रेक दि चेन’च्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश 5 एप्रिल रोजी राज्य सरकारने केला आहे. त्या आदेशानुसार आता पेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने, सर्व प्रकारच्या कार्गो सेवा, डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी-माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा, शासकीय व खासगी सुरक्षा सेवा व फळविक्रेत्यांच्या सेवेचा समावेश आहे. या सेवा देखील आवश्यक सेवामध्ये येतील.
आवश्यक सेवांची मर्यादा वाढविल्याने जनजीवन सुरळीत सुरू राहील असा विश्वास पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला.
5 ते 30 एप्रिल पर्यंत लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाविषयक नागपुरातील छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी, व्यापारी संघटना/संस्था यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी व्यक्तिगत भेटून चर्चा करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाने केलेल्या आदेशानुसार संचारबंदीच्या वेळेत म्हणजे रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत रेल्वे, बसेस, विमान प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी अडचणी टाळण्यासाठी जवळ अधिकृत तिकिट बाळगावे.
जिल्हयात औद्योगिक कामगारांनी त्यांच्या कामाच्या वेळापत्रकानुसार ओळखपत्र सोबत बाळगावे. विवाह किंवा अंत्यसंस्कारासाठी 4 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशातील नियमांचे पालन करून परवानगी देता येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नियम न पाळणाऱ्यांवर दंड आकारणा
ब्रेक द चेन अंतर्गत खासगी आस्थापना व कार्यालये सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत निर्बंधासह सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणावर खासगी आस्थापनात अनेक तरुण-तरुणी कार्यरत आहेत. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागेल. जोपर्यंत लसीकरण होत नाही तोपर्यंत दर 15 दिवसांचे कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगावे लागेल. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणाऱ्या व्यक्तींकडून 1 हजार रुपये दंड घेण्यात येईल.दंड आकारण्यामागे कोविड प्रतिबंधाचा प्रांजळ हेतु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परवानगी असणारे खासगी आस्थापना व कार्यालये
सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त संस्था जसे की स्टॉक मार्केट, डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, प्राथमिक डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स,
सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे,सर्व मायक्रो फायनान्स संस्था, सर्व वकिलांची कार्यालये, कस्टम हाऊस एजंट्स, लस/औषधी/जीवनरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक करणारे परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर यांना नवीन नियमानुसार परवानगी असेल.
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास रात्री 8 नंतर घरी प्रवास करावयाचा असेल तर हॉल तिकीट बाळगावे लागेल.
आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी विवाह समारंभ असल्यास स्थानिक प्रशासन त्यासंदर्भात नियमांचे पालन करण्याच्या अटींवर परवानगी देईल.
घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी यांच्या रात्री 8 नंतर ये-जा करणाऱ्यांनी आवश्यक ओळखपत्र बाळगावे.
ब्रेक द चेन मध्ये नविन सेवांचा अंर्तभाव हा जनजीवन सुरळीत राहण्यासाठी केला आहे. कोरोना नियंत्रणासह अर्थचक्रांसोबतच विदयार्थी, औदयोगिक कामगार, प्रवासी यांची दळणवळण सुविधा सुरळीत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आज दिनांक 6 एप्रिल रोजी जिल्ह्यात 3305 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर 3758 नवीन रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.13 टक्के असून 54 मृत्यू झाले. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत असून नागरिकांनी देखील योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
शासकीय कार्यालयात येण्यास प्रतिबंध
4 एप्रिलपासून नागपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये नागरिकांनी येण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी नागपूर यांनी स्पष्ट निर्देश काढले असून 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंधाच्या काळात नागरिकांनी शासकीय कार्यालयात येणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. नागरिकांनी आपले अर्ज, तक्रार ऑनलाइन स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावे. त्यासाठी collectortenagpur@
महानगर पालिका आयुक्तांनी देखील महानगर पालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये अभ्यागतांना येण्यास प्रतिबंध केला आहे. नागरिक आपल्या तक्रारी नागपूर लाईव्ह सिटी मोबाईल ॲपवर करू शकतात. नागरिकांनी गरज नसतांना घराबाहेर पडूच नये व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.