तब्बल ५ हजार कोटींच्या वीज बिलांचा ऑनलाईनद्वारे भरणा
लॉकडाउन काळात ऑनलाइन वीज बिल भरण्याचे महावितरणचे आवाहन
नागपूर दि. ७ एप्रिल २०२१:
वीज ग्राहकांना रांगेत उभे न राहता कधीही तसेच सुलभतेने व सुरक्षितपणे वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणने वीज ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. या ऑनलाईन वीज बिल भरण्याच्या सुविधेला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून मागील आर्थिक वर्षात विदर्भात एकूण वीज बिल भरणा पैकी सुमारे ५ हजार ४३७ कोटी रुपयांचे वीज बिल ग्राहकांनी ऑनलाईनद्वारे भरले आहे. महावितरणची वेबसाईट व मोबाईल अँप तसेच अन्य पर्यायांद्वारे ऑनलाईन वीजबिल भरणा क्रेडीट कार्ड वगळता निःशुल्क आहे. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात वीजबील भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहून किंवा गर्दी टाळून घरबसल्या ऑनलाईन वीजबिल भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या आर्थिक वर्षात नागपूर,अकोला,अमरावती,गोंदिया आणि चंद्रपूर या पाच परिमंडलाचा समावेश असलेल्या विदर्भातील सर्वच वर्गवारीतील ग्राहकांनी वीज बिलापोटी एकूण ८ हजार ९४६ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. यात ऑनलाईन माध्यमातून महावितरणकडे सुमारे ५ हजार ४३७ कोटी रुपयांचा भरणा वीज ग्राहकांनी केला असून ऑफलाइन अर्थात वीज बिल भरणा केंद्रावर जाऊन ग्राहकांनी सुमारे ३ हजार ५३९ कोटी रुपये भरले आहेत. ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक नागपूर परिमंडलात असून येथे ३ हजार ५० कोटी रुपये ग्राहकांनी ऑनलाइनने भरले आहेत. ऑनलाइन द्वारे भरणा केली रक्कम व परिमंडल अशी आहेत. चंद्रपूर परिमंडल- ७७१ कोटी,अमरावती परिमंडल -६५५ कोटी,अकोला परिमंडल - ५३७ कोटी,गोंदिया परिमंडल-४२१ कोटी रुपये. विदर्भात मार्च २०२१ मध्ये सर्वाधिक ११ लाख ४० हजार ग्राहकांनी सुमारे ६०४ कोटी रुपयांचा वीज बिलांचा भरणा ऑनलाइनच्या माध्यमातून केला आहे.
ऑनलाईन बिल भरण्यासाठी ग्राहकांना www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अँप ची सुविधा उपलब्ध आहे. यावर चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा 'ऑनलाईन' भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या शिवाय लघुदाब वीजग्राहकांसाठी 'ऑनलाईन' बिल भरतांना दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच क्रेडीटकार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीटकार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून 'ऑनलाईन'द्वारे होणारा वीजबिल भरणा निःशुल्क आहे. ऑनलाईनद्वारे वीजबिल भरणा केल्यानंतर ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लगेचच एसएमएस द्वारे पोच देण्यात येते.
ऑनलाईनद्वारे वीज बिल भरणे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सोयीचे असून त्यातून ग्राहकांना वीज बिलावर सूटही मिळते. महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्राहक मोठ्या संख्येत ऑनलाइन वीज बिल भरत असून इतरही ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा.विशेषतःराज्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वीजग्राहकांनी आरोग्यविषयक काळजी ऑनलाईन सोयीद्वारे घरबसल्या वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.