आहार संघटनेच्या प्रतिनिधींनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
मुंबई, दि. 17 : इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (आहार) च्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन संघटनेच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी संघटनेच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या भेटीवेळी कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी, सरचिटणीस सुकेश शेट्टी, उपाध्यक्ष विजय शेट्टी, प्रसाद शेट्टी, सुभाष सुवर्ण आदी मान्यवर उपस्थित होते.
लॉकडाऊननंतर कोरोना नियंत्रणविषयक नियमांचे पालन करुन रेस्टॉरंटस् सुरु करण्यासाठी संमती दिल्याबद्दल संघटनेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचे आभार मानले. तथापि, कोरोना संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंटस्चे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सुमारे ६ महिने रेस्टॉरंटस् बंद असल्याने मुंबई महापालिका क्षेत्रात सहा महिने कालावधीसाठी लायसन्स फी माफ करण्यात यावी. तसेच एक्साईज लायसन्स फी चार सुलभ हप्त्यांमध्ये भरण्यास संमती मिळावी, अशा मागण्यांचे निवेदन संघटनेमार्फत सादर करण्यात आले. संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.