मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराच काळ चर्चा झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचक वक्तव्याने या संभ्रमात आणखीनच भर टाकली. आजच्या भेटीमुळे ज्यांना राजकीय चर्चा करायची आहे, त्यांनी ती करू द्या. शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू असणार नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये नक्की शिजतंय तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दरम्यान, या भेटीत माझ्या मतदारसंघातील विकास कामांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. तसेच चंद्रपूर विमानतळाबाबतही आमच्यात बोलणी झाली, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील विहिरगाव व मूर्ती येथील प्रस्तावित ग्रीनफिल्ड विमानतळाच्या वनजमिनी हस्तांतरणा बाबत फेरप्रस्ताव केंद्राकडे सादर करावा या व जिल्ह्यातील इतर प्रश्नांबाबत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.