साडे तीन महिन्याची पूर्वी व अडीच वर्षाची तृप्ती दुर्घटनेत सुखरूप
तीन वर्षापासून घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे कुंभरे कुटुंबीय.
संजीव बडोल प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.20 फेब्रुवारी:-
आज दि.20 फेब्रुवारी च्या रात्री दीड वाजेच्या सुमारास येथील प्रभाग क्रमांक सहा मधील वच्छला गोपिचंद कुंभरे यांचे राहते घर कोसळण्याची दुर्घटना घडली यात त्यांची सून जखमी झाली . वच्छलाबाई कुंभरे ह्या 65 वर्षीय महिला दोन मुले, सून, दोन नात अश्या 6 जण आपल्या झोपडीवजा तुटक्या-फुटक्या घरात राहत होते. घरातील सर्व गाढ झोपेत असताना आज रात्री दीडच्या सुमारास त्यांचे घरच कोसळले. दोन दिवसापूर्वी अवकाळी पाऊस कोसळले होते. घराच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुंभरे कुटुंबियांनी एकच आरडाओरड केली. लहान मुले रडायला लागली. तसे घर कोसळण्याचा आवाज आल्याने शेजारी-पाजारी धावले व त्यांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुंभरे कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढले. यात वच्छलाबाईची सून उर्मिला हिच्या डोळ्याला, हाताला व पायाला ईजा झाली आहे. त्यांना रात्रीच ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. ढिगाऱ्याखाली दबलेली साडे तीन महिन्याची पूर्वी व अडीच वर्षाची तृप्ती या दोन्ही नात, वच्छलाबाई ची दोन मुले व सून असे सहा जण नशीब बलवत्तर म्हणूनच या दुर्घटनेतून सुखरूप बचावले. अद्यापही असे कितीतरी कुटुंब घरकुल योजने पासून वंचित आहेत. ते तुटक्या-फुटक्या झोपडीवजा घरात वास्तव्य करीत आहेत. अधून मधून अवकाळी पावसाचा धोका आहेच. ग्रामपंचायत, शासन-प्रशासन आणखी घरकुलासाठी अशा किती कुटुंबांचे अंत पाहणार आहे.आम्ही अडाणी असल्यामुळे कागदपत्रांच्या पाठपुरावा करू शकलो नाही, त्यामुळे आम्हाला तीन वर्षापासून अजूनही घरकुल मिळाले नाही. अशी खंत वच्छलाबाई यांनी व्यक्त केली आहे. तर प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांनी अत्यंत गरजू लोकांना घरकुल मिळण्यास विलंब होत असल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. ग्रामपंचायत च्या वतीने शंभर अत्यंत गरज घरकुलांचे गरज असलेल्या लोकांची यादी पाठविले आहे. पूर्वी संगणीकृत झालेल्या अ यादीतील लाभार्थ्यांना घरकुल मिळणार, त्यानंतर ब,क,ड यादीतील गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळतील अशी प्रशासकीय व्यवस्था आहे अत्यंत गरजूंना ताबडतोब घरकुल देता येत नाही, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येते. तर कुंभरे कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायत तातडीने करेल. असे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी सांगीतले आहे. नवेगावबांध येथील अत्यंत गरजू शंभरेक लाभार्थ्यांना शासनाने तातडीने घरकुल मंजूर करावे व अशा दुर्घटना टाळाव्यात असेही शहारे पुढे म्हणाले.