Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १२, २०२१

भिडेवाडा वास्तु संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने त्वरित समितीचे गठन करावे -अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ



मुंबई दि. 12: पुण्यातील भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पाहिली शाळा येथे सुरु केली. या वास्तुचे संवर्धन करण्यासाठी ही वास्तु स्मारकामध्ये रुपांतरित करणे आवश्यक आहे. मात्र गेल्या दहा वर्षांपासून या प्रकरणात तोडगा निघाला नसल्याने सांस्कृतिक कार्य विभागाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समितीचे गठन करावे अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले.


महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेची वास्तू असणारा भिडेवाडा स्मारकामध्ये रुपांतर करण्यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, आमदार रोहित पवार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त  आयुक्त रुबल अग्रवाल, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून भूसंपादनाचे काम पाहणारे संबंधित अधिकारी यांच्यासह नगरविकास विभागाचे उपसचिव सतिश मोघे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


श्री. भुजबळ यावेळी म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा ही वास्तु खाजगी मालकीची आहे. तसेच या वास्तुत राहणाऱ्यांनी भाडेकरुंनी दहा वर्षापूर्वी न्यायालयात धाव घेतल्याने सदर प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी त्वरित समिती नेमण्यात यावी. या समितीमध्ये नगरविकास, सांस्कृतिक कार्य आणि महसूल विभागाचे संबंधित अधिकारी यांच्यासह पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांचा समावेश असावा. सदर समिती भिडेवाडा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी काय करता येईल तसेच याप्रकरणात न्यायालयाच्या बाहेर संमतीने काय करता येईल याबाबतची शक्यताही तपासण्यात यावी.


येत्या 15 दिवसात पुन्हा बैठक लावण्यात येणार -- अमित देशमुख

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आवश्यक असणारी समिती नेमण्याबरोबरच येत्या 15 दिवसात याविषयाबाबत पुढील बैठक बोलवण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले.तसेच पुढील बैठकीसाठी संबंधित विभागांबरोबरच ॲडव्होकेट जनरल यांनाही बोलविण्यात येईल. फुले दाम्प्त्याने  भिडेवाडा येथे सुरु केलेल्या मुलींच्या शाळेची वास्तू सांस्कृतिक कार्य आणि पुरातत्व विभागामार्फत राज्य स्मारक म्हणून घोषित करण्यासंदर्भातही शासन सकारात्मक असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.