नागपूर- शहरातील उद्यानांमध्ये मनपा द्वारे नागरिकांना प्रवेशा करिता शुल्क लावण्याचा निर्णय निंदनीय असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा विरोध करीत आहे असे मनसेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. करदात्या नागरिकांच्या डोक्यावर अजून हा बोजा कशासाठी ? सर्वसामान्य नागरिक हा आपल्या कुटुंबासोबत काही आनंदी क्षण निसर्गाच्या सानिध्यात घालविण्यासाठी जात असतो. आरोग्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, लहान मुले खेळण्यासाठी आनंदाचे क्षण घालवितात, नागपूर मनपा जर सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश शुल्क लावून त्यांच्या हक्कावर गदा आणत असेल तर मनसे याचा विरोध करेल. सत्ताधारी पक्षाने नेहमीच तिजोरीत खडखडाट असल्याचा कांगावा करून कशाप्रकारे जनतेच्या खिशात हात घालत येईल याकडेच लक्ष दिले आहे. उद्यानात जाणारा मध्यमवर्गीय नागरिक श्रीमंतांसारखे आपल्या कुटुंबासाठी खर्च करू शकत नाही. शहरातील उद्याने हेच त्यांच्या विरंगुळ्याचे ठिकाण आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली उद्यानांचे व्यावसायिकरण करून खाजगी कंत्राटदारांच्या घशात घालायचे, जनतेची लूट करायची आणि विकासाच्या गप्पा मारायच्या ही संतापजनक बाब आहे. शहरातील उद्यानांची जर ही सत्ताधारी मनपा साधी देखभाल करू शकत नसेल तर यांना सत्तेवर राहायचा मुळीच अधिकार नाही. उद्यानात प्रवेशासाठी नागरिकांवर लादण्यात येणारे शुल्क व खाजगीकरण तातडीने रद्द करावे अन्यथा मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनात मनसे पदाधिकारी पुढील काळात आंदोलनात्मक पवित्रा घेतील अशी भूमिका मनसे शहर अध्यक्ष अजय ढोके यांनी चर्चे दरम्यान मांडली.
आपल्या भावना शासन स्तरावर तातडीने कळवून यावर तोडगा निश्चित काढू असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी यांनी मनसे शिष्ट मंडळाला दिले.
मनसे शिष्टमंडळात शहर अध्यक्ष अजय ढोके यांचेसह उत्तर विभाग अध्यक्ष उमेश बोरकर, महिला सेना शहर अध्यक्षा संगीता सोनटक्के, उत्तर विभाग सचिव महेश माने, द. प. विभाग सचिव तुषार गिरहे, उत्तर विभाग उपाध्यक्ष लाला ससाणे, द. प. विभाग उपाध्यक्ष सुभाष ढबाले, पश्चिम विभाग सचिव पराग विरखरे, उत्तर विभाग उपसंघटक मोहित देसाई, शाखा अध्यक्ष श्याम मेंढे, जमशेद अन्सारी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.