शहीद पोलीस उपनिरीक्षक दिपक रहिले यांना श्रद्धांजली
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.21 जानेवारी:-
दिनांक 20 जानेवारी रोज बुधवार ला मौजा कान्होली येथे शहीद पोलीस उपनिरीक्षक दीपक सखाराम रहीले यांच्या शहीद दिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक दीपक सखाराम पहिले पोलीस स्टेशन चिचगडअंतर्गत कर्तव्यावर असताना दिनांक 20 जानेवारी 2003 रोजी नक्षलवाद्यांनी मंगेझरी पुलावर घडवून आणलेल्या बाँबस्फोटात हे शहीद झाले होते. त्यांची स्मृती व प्रेरणा सतत तेवत राहावी म्हणून, दरवर्षी 20 जानेवारीला त्यांचा जन्म गाव कान्होली येथे नियमितपणे शहीद दिन दरवर्षी पाळला जातो.
शहीद दिन कार्यक्रमाला नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर कान्होली ग्रामपंचायतचे सरपंच संजय खरवडे, धाबेपवनी पोलीस दूर क्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक पानसरे ,शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश भेंडारकर, कोदुजी राहिले, ग्रामसेवक बी. डब्ल्यू. झोडे, मुखरण थेर, दीपक रहिले यांच्या पत्नी पुष्पा व मुलगा सागर रहिले उपस्थित होते.
प्रारंभी शहीद पोलिस उपनिरीक्षक दीपक रहीले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून व पुष्पहार अर्पण करून, एक मिनिटे मौन पाळून रहीले परिवार ग्रामस्थ व पोलीस विभागाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या जीवनकार्यावर उपस्थितांचे भाषणे झाली.
शहीद दीपक रहीले यांच्या पत्नी पुष्पा व मुलगा सागर आणि कान्होली येथील रहीले परिवाराच्या वतीने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इयत्ता दहावी व बारावी मधील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना ना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. गावातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार महेंद्र रहीले यांनी मानले. कार्यक्रमाला पोलीस विभागाचे कर्मचारी , कान्होली ग्रामस्थ महिला पुरुष , ग्रामपंचायतचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.