कचरा घोटाळ्याविरुद्ध पप्पू देशमुख यांचा सभात्याग
भ्रष्टाचाराविरुद्ध पुरावे दिल्यावर महापौर-उपमहापौर यांचे संतुलन का जाते ? देशमुख यांचा सवाल
चंद्रपूर/ प्रतिनिधी
कचरा व भोजन घोटाळ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार करणार..
आज मनपाची आमसभा सुरू झाल्यानंतर शहर विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक पप्पू देशमुख यांनी कचरा संकलन व वाहतुकीच्या कामामध्ये कंत्राटदाराला लाभ पोहोचवण्यासाठी स्थायी समितीच्या २१ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या बैठकीमध्ये नियम डावलून ठराव घेण्यात आल्याची तक्रार महापौर राखी कंचर्लावार यांच्याकडे केली. मात्र उपमहापौर तथा स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे यांनी महापौर राखी कंचर्लावार यांची परवानगी न घेता मध्ये बोलून देशमुख यांच्या बोलण्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे संतापलेल्या देशमुख यांनी कचरा घोटाळ्या विरुद्ध नारेबाजी करीत सभात्याग केला.
कंत्राटदाराने कमी दराने काम टाकले असल्यास व दर व्यावहारीक नसल्यास त्याचेकडून 'रेट अॅनालीसीस' मागवणे व त्यानंतर कारवाई करणे नियमानुसार आवश्यक असते.मात्र स्थायी समितीने सर्व नियम व प्रक्रिया धाब्यावर बसवून दोन ओळींचा ठराव घेतला व जुने कंत्राट रद्द केले.नंतर २८०० रुपये प्रति टन दराने त्याच कंत्राटदाराला नवीन कंत्राट देण्यात आले. २०१३ मध्ये याच कामासाठी स्थायी समिती मध्ये कंत्राट मंजूर करत असताना सविस्तर माहिती देण्यात आली होती.तसेच संबंधित कंत्राटदाराशी तिन वेळा 'निगोसिएशन' करून दर कमी करण्यात आले होते. ७ वर्षांसाठी १७ कोटी रुपये किंमत २०१३ च्या स्थायी समितीमध्ये गृहीत धरण्यात आली होती. मात्र आता ७ वर्षासाठी याच कामाला ६७ कोटी रुपये खर्च येणार आहे. ४०० टक्के जास्त रक्कम पुढील ७ वर्षांमध्ये मोजावी लागणार आहे. कामगारांना किमान वेतन द्यायचे असल्याने कंत्राट रद्द करण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे वारंवार सांगत आहेत. मात्र किमान वेतनामध्ये केवळ २०० टक्के वाढ झाली.मग एकूण कंत्राटाच्या किमतीमध्ये चारशे टक्के वाढ कशी झाली ? याची माहिती देणे स्थायी समिती अध्यक्ष जाणीपूर्वक टाळून सर्वांची दिशाभूल करीत आहेत असा आरोप देशमुख यांनी केला.
या भ्रष्टाचाराविरूध्द पुरावे देऊनही महापौर कारवाई करण्यास टाळाटाळ करतात आणि संतुलन गेल्यासारखे 'तु-मी' च्या भाषेत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देतात. त्यामुळे स्थायी समितीच्या निर्णया विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी न्यायालयामध्ये दाद मागणार तसेच जनतेमध्ये जाऊन मनपातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणार अशी प्रतिक्रिया नगरसेवक देशमुख यांनी दिली.