मकरसंक्रांत सदभावना दिन म्हणून उत्साहात साजरा
कार्यक्रमात विधवा महिलांचा सहभाग.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.16 जानेवारी:-
मकर संक्रांती निमित्त नवेगाव बांध येथील, प्रभाग परिसरातील क्रांती चौक येथेदि.15 जानेवारी शुक्रवारला , मैत्री- सदभावन दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच सौभाग्यवती महिला वाण वाटपाच्या उत्सवात, पारंपारिक पद्धतीप्रमाणे विधवा महिलांना स्थान नसते, पण यावेळी सद्भावना दाखवत त्यांना या उत्सवात सन्मानाने आमंत्रित करून सहभागी करण्यात आले. या उल्लेखनीय उपक्रमाने अनेकांचे लक्ष वेधले.नवेगाव बांध येथील प्रभाग एक परिसरातील क्रांती चौक येथे शुक्रवारला मकर संक्रांती निमित्त मैत्री- सदभावन दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपारिक पद्धतीने या दिवशी सौभाग्यवती महिला वाण- वाटण्याचा उत्सव साजरा करतात. परंतु त्यात विधवा महिलांना स्थान नसते. पण यावेळेस मैत्री सदभावना उत्सवात, विधवा महिलांना सन्मानाने आमंत्रित करण्यात आले. हे या उत्सवात उल्लेखनीय होते. उपस्थित महिलांनी स्वयंस्फूर्तीने गीत गाऊन उखाणे घेतली.त्यासोबतच तिळगुळ वाटून हळदी- कुंकूचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सपना बन्सोड यांनी अंधश्रद्धांचा परिचय ह्या पुस्तकाचे वाटप केले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वनश्री जांभूळे यांनी भुषविले असून, प्रमुख अतिथी म्हणून सिंधुताई येरणे, शोभाताई येरणे व सोनवाने ताई उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदाताई येल्ले यांनी केले असून, आभारप्रदर्शन रेखाताई शहारे यांनी केले. अल्पोपहार घेऊन कार्यक्रम संपन्न झाला. प्रभागातील बहुसंख्य महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या