सेलिब्रेशन ऑन व्हील्स दरम्यान असभ्य वर्तन करणाऱ्यांवर एफआयआर नोंदवण्यासाठी महा मेट्रो तर्फे तक्रार दिली
· जय जवान जय किसान चे प्रशांत पवार आणि अन्य कार्यकर्त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी महा मेट्रो तर्फे तक्रार दिली
नागपूर, 21 जानेवारी: वाढदिवसा सारखे चांगले क्षण स्वकीयांसोबत घालवता यावे या करता महा मेट्रो तर्फे सुरु केलेल्या `सेलिब्रेशन ऑन व्हील्स' उपक्रमात गोंधळ घालणाऱ्यांवर एफआयआर रजिस्टर करण्याकरता महा मेट्रो तर्फे तक्रार नोंदवण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात या संबंधीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. २० जानेवारीला `सेलिब्रेशन ऑन व्हील्स' अंतर्गत वाढ दिवस साजरा करण्याकरता मेट्रो गाडी बुक करत गाडीत प्रवासा दरम्यान आपल्या कृतीने महा मेट्रोला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेखर शिरभाते व राहुल कोल्हे, जय जवान जय किसानचे प्रशांत पवार आणि त्यांच्या अन्य साथीदारांच्या विरोधात हि तक्रार नोंदवण्यात आली आहे.
महा मेट्रोतर्फे नागरिकांकरता `सेलिब्रेशन ऑन व्हील्स' हि अनोखी योजना राबवली जात असून याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळात आहे. फक्त ३०५० रुपये मध्ये वाढदिवस, प्री-व्हेंडिंग शूट, लग्नाचा वाढदिवस व या सारखे इतर कार्यक्रम साजरा करू शकतात. या योजनेचा नागपूरकर मनस्वी आनंद घेत या माध्यमाने आपल्या आयुष्याचे कहाणी महत्वाचे दिवस आपल्या परिवारासोबत घालवत होते. आज पर्यंत सुमारे ६० परिवारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
या उपक्रमात आजवर अनेक मान्यवर आणि नामदारांनी सहभाग घेतला आहे. या शिवाय स्थानिक उद्योजक श्री जय प्रकाश गुप्ता, एयर इंडिया एमआरओ मध्ये कार्यरत वरिष्ठ अधिकारी श्री वैभव शिंपी, बांधकाम व्यावसायिक श्री सावंत हिराणी, नागपूरचे महापौर श्री दया शंकर तिवारी याचे पुत्र श्री अथ तिवारी आणि या सारख्या अनेक मान्यवरांनी आपल्या स्वकीयांचा वाढ दिवस मेट्रो ट्रेन मध्ये साजरा केला होता. अश्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या उपक्रमाला गालबोट लावण्याचे काम काही समाज कंटकांनी केले आहे. हे चिथावणीखोर कृत्य जाणीव पूर्वक घडवून आणण्यात आले आहे.
एकीकडे नागपूरकर असा उत्स्फूर्त प्रतीसाद देत असताना, दुसरीकडे मेट्रो गाडीत धुडगुस घालत, मेट्रो प्रवासाच्या आणि सार्वजनिक आयुष्यातील संकेतांची पायमल्ली करण्याचा प्रकार २० जानेवारी रोजी घडला आहे. शेखर शिरभाते यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने त्यांनी आणि राहुल कोल्हे यांनी मेट्रो ट्रेन बुक केली होती. पण सीताबर्डी ते लोकमान्य नगर प्रवासा दरम्यान त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी असभ्य वर्तन करत नागपूर मेट्रोला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मेट्रो प्रवासात तृतीय पंथियांसोबत असभ्य वर्तन, नाच गाणे आणि पैसे उधळले. तसेच जुगार खेळण्याचा प्रयत्न देखील केला.
या सर्व घटनांची प्रसार माध्यमांनी गंभीर दखल घेतली. महा मेट्रो ने देखील याची दखल घेत त्या संबंधी एफआयआर नोंदवण्यासाठी मेट्रो रेल्वे (ऑपरेशन मेंटेनन्स) ऍक्ट २००२ च्या कलम ५९ आणि ६४, भारतीय दंड संहितेच्या कलम ३४, १४९, १८८, २६८ आणि २९४ तसेच गॅम्बलिंग ऍक्ट च्या कलाम १३ अंतर्गत महा मेट्रोतर्फे सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सेलिब्रेशन ऑन व्हील्स' या योजने अंतर्गत मेट्रो ट्रेन मध्ये आनंदोत्सव साजरा करताना कुठल्याही प्रकारचे अशोभनीय व्यवहार करू नये असे आवाहन महा मेट्रोच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.