Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी २८, २०२१

योग आणि ध्यान साधना या विषयावरील ऑनलाइन अभ्यासक्रमाचे मा.कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी यांच्या शुभहस्ते उद्घाटन

योग आणि ध्यान साधना या विषयावरील ऑनलाइन अभ्यासक्रमाचे मा.कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी यांच्या शुभहस्ते उद्घाटन


नागपूर: मातोश्री अंजनाबाई बहुउद्देशीय महिला विकास मंडळ नागपूरद्वारे मातोश्री अंजनाबाई मेश्राम यांच्या २६ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने एक महिना चालणाऱ्या योग आणि ध्यानसाधना ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकचे माननीय कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांच्या शुभहस्ते २७ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाइन झूम लिंकवर सकाळी ९.३० वाजता झाले. प्रस्तुत उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम होते. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून डॉ. एम. एम. घारोटे, अध्यक्ष, योगा इन्स्टिट्यूट लोणावळा, पुणे , डॉ. पियुष जैन, राष्ट्रीय सचिव, फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया, इंजिनीयर संजय खोडे, इंटरनॅशनल योगा एक्सपर्ट एक्झामिनर, नागपूर,संस्थेचे अध्यक्षा डॉ. ललिता पुनैय्या, सचिव डॉ. वंदना मेश्राम, उपाध्यक्षा डॉ. राजश्री मेश्राम, डॉ.मनीषा हिरेखन यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
मातोश्री अंजनाबाई मेश्राम यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून ऑनलाइन योग व ध्यान साधना अभ्यासक्रमाचे उद्घाटन झाले. यानंतर प्रास्ताविक भाषणातून संस्थेच्या सचिव डॉ. वंदना मेश्राम यांनी मातोश्री अंजनाबाई मेश्राम यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला . वर्तमान काळात मानवी स्वास्थ्यासाठी योग आणि ध्यान साधना ह्या बाबी किती अपरिहार्य आहेत याविषयी सविस्तर विवेचन केले व एक महिना चालणाऱ्या योग आणि ध्यान साधना ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्सच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.या प्रसंगी प्रमुख डॉ. पूरणचंद्र मेश्राम, माननीय कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी या मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ. एम. एम. घारोटे यांना योगशास्त्रात डी.लीट. प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. मनीषा हिरेखन लिखित 'बुद्ध निकायोका इतिहास' या पुस्तकाचे विमोचन डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डॉ. वंदना मेश्राम लिखित 'व्हॅल्यू अँड इन्व्हरमेंट एज्युकेशन' या विषयावरील पुस्तकाचे सुद्धा मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
यानंतर डॉ. एम.एम. घारोटे यांनी सत्काराला उत्तर देताना योगाचे महत्त्व पटवून सांगितले व योगासंबंधी ज्या चुकीच्या धारणा आहेत त्या धारणा दूर करून आयुष्याच्या परंपरेतून उदयाला आलेल्या शुद्ध योगापद्धतीविषयी त्यांनी विस्तृत विवेचन केले. माननीय कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी मार्गदर्शन करताना म्हणाले, योग आणि मानव यांचे अतूट नाते आहे. वर्तमानकाळात मानवी जीवन फार स्पर्धेचे आणि धकाधकीचे झाले आहे. माणूस स्वतःची प्रगती करीत असताना आपल्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे त्याला भविष्यात अनेक आजार जडतात. परंतु या आजारापासून स्वतःला दूर ठेवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात योग आत्मसात करणे अनिवार्य आहे. योगामुळे मानव शारीरिक आणि मानसिक दोन्ही रोगांपासून मुक्त राहू शकतो तसेच माणसाला अधिक ऊर्जा प्राप्त होते मनाचे आणि शरीराचे संतुलन कायम ठेवण्यासाठी योग आणि ध्यान साधना अत्यंत अपरिहार्य आहे.योग आणि ध्यान साधनेमुळे मनुष्याला प्रेरणादायी आंतरिक ऊर्जा प्राप्त होते. डॉक्टरांकडे त्याला वारंवार जावे लागत नाही. त्यामुळे त्याच्या पैशाचीसुद्धा बचत होते, असेही ते म्हणाले. मातोश्री अंजनाबाई बहुउद्देशीय महिला विकास संस्थेने एक महिन्याच्या योगाभ्यासक्रमाचे ऑनलाईन आयोजन केले त्याबद्दल त्यांनी सर्व आयोजकांचे अभिनंदन सुद्धा केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी मातोश्री अंजनाबाई मेश्राम यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी आईची महिमा वर्णित केली. आईवरील कवितेतून त्यांनी आईची थोरवी गायली आणि योग व ध्यान साधनेचे महत्व पटवून सांगताना वर्तमान परिस्थितीमध्ये कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे मानव लॉकडाऊन, कोरोंटाइन, सोशल डिस्टंसिंग या प्रक्रियेतून गेला याचा सहसंबंध त्यांनी योग आणि ज्ञानसाधनेची जुळवून उत्तम स्वरूपाचे मार्गदर्शन त्यांनी केले. योग आणि ध्यान साधना ह्या क्रिया माणसाला सामाजिक अंतर पाळून एकांतात राहून योग आणि ध्यानसाधना केल्यास माणसाच्या प्राकृतिक आणि मानसिक स्थितीमध्ये विलक्षण परिवर्तन होते आणि मानवामध्ये नवी ऊर्जा जागृत होते. या ऊर्जेमुळे मानवाच्या हातून अनेक पराक्रम घडतात असेही ते म्हणाले. वर्तमानकाळात योग आणि ध्यानसाधनेला पर्याय नाही असे सांगून जास्तीतजास्त लोकांनी योग आणि ध्यान साधना या विषयावरील अभ्यासक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. यानिमित्त डॉ. पियुष जैन, राष्ट्रीय सचिव, फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया, इंजिनीयर संजय खोडे, इंटरनॅशनल योगा एक्सपर्ट एक्झामिनर, नागपूर नही मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रस्तुत उद्घाटन समारंभाचे संचालन मातोश्री अंजनाबाई बहुउद्देशीय महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा डॉ. ललिता पुन्नय्या यांनी केले तर आभार धनवटे नॅशनल कॉलेजचे सहयोगी प्रा. डॉ. सुभाष दाढे यांनी केले. प्रस्तुत उद्घाटन समारंभाचे तांत्रिक नियोजन करणारे सिद्धांत मेश्राम, रचित मेश्राम, वैदेही इंगळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
समाजकार्य महाविद्यालय कामठी, यशोदा गर्ल्स आर्ट अँड कॉमर्स कॉलेज नागपूर, एस.जी.बी.वुमन कॉलेज तुमसर, एन. जे. पटेल आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मोहाडी, एस आर बी टी कॉमर्स कॉलेज मौदा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत ऑनलाइन योग व ज्ञानसाधना अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक २७ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत हा अभ्यासक्रम आयोजित केला असून सद्यस्थितीतील कोरोना रोगाच्या जागतिक महामारी च्या पार्श्वभूमीवर या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी चांगले योग स्वयंसेवक घडविणे, लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चा विकास करणे इत्यादी उद्देशाने प्रस्तुत अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रस्तुत अभ्यासक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी युवकांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. प्रस्तुत सोहळ्याला मोठ्या संख्येने प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.