पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आग ; पाच जणांचा मृत्यू, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
पुणे/ प्रतिनिधी
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सीरमच्या BCG लस बनवण्याच्या इमारतीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. बिल्डिंगचं काम सुरू होतं. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली आणि वाढली. आता आग विझवण्यात आली आहे. आग आटोक्यात यायला 2 ते 3 तास वेळ लागला. आता आग आटोक्यात आली आहे. या आगीत पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत, असं राजेश टोपे म्हणाले.
राजेश टोपेंनी सांगितलं की, कोरोना लस निर्मिती जिथं होते ती इमारत घटनास्थळापासून दूर आहे. त्यामुळं लसीला कुठलंही नुकसान नाही. यासंदर्भात पोलिस तपास सुरु आहे, असं टोपेंनी सांगितलं.
काय म्हणाले होते अदर पुनावाला:-
सीरमचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, घटना कळल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आणि प्रार्थना केली, त्या सर्वांचे आभार. या आगीत जीवितहानी झालेली नाही, तसंच सुदैवाने कुणीही गंभीर जखमीही झालेलं नाही. या घटनेत काही मजल्यांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे, असं अदर पुनावाला यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले...
सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या. राज्याच्या यंत्रणेला देखील निर्देश दिले असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आग संपूर्णपणे विझवण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.