अर्जुनीमोर येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रारंभ
वैद्यकिय अधिकारी डॉ.श्वेता कुलकर्णी यांनी टोचली पहिली लस.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२५ जानेवारी:- बहुप्रतिक्षेत असलेली कोरोना विषाणू प्रतिबंधक लस अखेर अर्जुनीमोर तालुक्यात पोचली असून आजपासून(दि.२५जानेवारी) ग्रामीण रुग्णालय अर्जुनीमोर येथे लसीकरणास सुरवात झाली आहे. तालुक्यात सर्वप्रथम लसीकरणाचा मान डॉ.श्वेता कुलकर्णी(डोंगरवार) वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र चांना बाकटी यांना मिळाला.लसीकरणासाठी 883 फ्रन्टलाइन आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी 100 लोकांना आज लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील 883 आरोग्य विभागाच्या फ्रन्टलाइन अधिकारी, आशा कार्यकर्त्या, कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.यावेळी लसीकरण कक्षाचे उद्घाटन अर्जुनी मोरगाव तालुक्याचे तहसीलदार विनोद मेश्राम यांच्या हस्ते झाले.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राऊत ,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. घरतकर, डॉ. भांडारकर ,दंत शल्यचिकित्सक डॉ. खोब्रागडे वैद्यकीय अधिकारी गोठनगाव व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.