नागपूर : विद्यमान सत्र न्यायाधीश नागपूर श्रीमती सुनीता तिवारी यांनी आरोपी नामे अरविंद रामाजी मेटे आणि बबलू वाघमारे,रा.बीडपेठ नागपूर यांची पो.हवालदार सुभाष लांडे यांचेवर मारोती व्हॅन टाकून हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.
सरकार पक्षानुसार प्रकरण असे घडले की यातील आरोपी अरविंद यास मारोती गाडीने अवैध प्रवासी वाहतूक करतांना फिर्यादी सुभाष लांडे यांनी 23-2-2020 रोजी पकडले आणि कोर्टात केस केली. या गोष्टीचा अनावर राग आल्याने ,दि.27-2-2020 रोजी सायंकाळी 6 वा.ग्रेशियस हाॅस्पीटल सक्करदरा समोर फिर्यादी आपले बाईकवर बसून बोलत असता आरोपी अरविंद याने त्याला आपल्या मारोती व्हॅनने धडक मारून चिरडण्याचा प्रयत्न केला. असफल प्रयत्न करीत दोन्ही आरोपी पसार झाले.
सदर घटनेचा सविस्तर तपास करून तत्कालीन एपीआय श्री राजू बस्तवाडे यांनी दोषारोपपत्र दाखल केले.
प्रकरण सुनावणीस आल्यावर सरकारकडून एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीची साक्ष तसेच CCTV चे आधारावर आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारकडून एपीपी श्री. राकेश डगोरिया यांनी केली.
आरोपीतर्फे युक्तिवाद करतांना एड. चंद्रशेखर जलतारे यांनी सांगितले की सरकार पक्षाची बाजू ही केवळ गैरसमजा वर आणि खोट्या पुराव्यावर आधारित आहे. फिर्यादी हा रस्त्यावर बेजबाबदार रीतीने बोलत असता त्याला एका मारोती व्हॅन चा धक्का लागला एवढेच त्यात सत्य आहे. CCTV मधे गाडी नंबर स्पष्ट दिसत नाही. CCTV चा तपास कसा करायचा असतो याची कल्पना नसल्याचे पोलीस अधिकाऱ्याने मान्य केले आहे.शिवाय त्यांनी वरिष्ठांच्या आदेशांचे पालन केले नाही. संबंधित व्हॅनचे फोटो काढले नाहीत, तसेच मूळ FIR हा लेखी असता तो तोंडी कसा झाला याचे उत्तर पोलीसांपाशी नाही. एकदंरीत सर्व पुरावा,तसेच तपासकार्य हे अयोग्य आणि संशयास्पद असल्याने आरोपींना निर्दोष मुक्त करावे अशी विनंती केली.
उपलब्ध पुराव्यांचे सविस्तर विश्लेषण केल्यावर बचावाच्या युक्तिवाद ग्राह्य़ धरून माननीय न्यायाधीश महोदयांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
सरकारकडून एपीपी श्री राकेश डगोरिया यांनी काम पाहीले तसेच आरोपीतर्फे एड. चंद्रशेखर जलतारे आणि एड. राम मासुरके यांनी बाजू मांडली.