पालकांच्या सहकार्याशिवाय शैक्षणिक विकास असंभव : सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुरुषोत्तम सोनवाने
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.1 डिसेंबर:-
पालकांच्या सहकार्याशिवाय शिक्षण प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. येरंडी येथील पालक व ग्रामवाशीयांच्या सहकार्यामुळे आपण येथील 16 वर्षाच्या कार्यकाळाचे इंद्रधनुष्य पेलवू शकलो.पालकांच्या सहकार्याशिवाय शैक्षणिक विकास असंभव आहे.असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुरुषोत्तम सोनवाणे यांनी केले. पंचायत समिती अर्जुनीमोर अंतर्गत सिलेझरी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरंडी विहिरगाव येथील मुख्याध्यापक पी.व्ही.सोनवाने नियत वयोमानानुसार 30 नोव्हेंबर रोज सोमवारला सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्ताने त्यांच्या निरोप समारंभ व सेवानिवृत्ती सत्कार 1 डिसेंबर रोज मंगळवारला सकाळी 9.30 वाजता शाळेत आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश ब्राम्हणकर हे होते. यावेळी अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक दिवाकर नागोसे, माजी केंद्रप्रमुख बी. डब्ल्यू. भानारकर,पोलीस पाटील हनवत बारसे,मानप्रकाश येडेकर, विनोद चीचमलकर,लेकराम हेमने, किशोर बोरकर, जनार्दन दोनोडे, कविता बहेकार, रूपाली हेमने उपस्थित होते.
सत्कार समारंभाच्या प्रारंभी शारदा मातीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्राह्मणकर व अतिथींच्या हस्ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुरुषोत्तम सोनवाने व त्यांच्या सुविद्य पत्नी दुर्गाबाई सोनवाने यांचा शाल श्रीफळ साडीचोळी व भेटवस्तू देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.अतिथींनी आपल्या भाषणातून सेवानिवृत्त मुख्याध्यापक सोनवाने 16 वर्षे,9 महिने यांच्या कार्यकाळाचा गौरवाने उल्लेख करून, त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन मुख्याध्यापक दिवाकर नागोसे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गणेश ब्राह्मणकर यांनी मानले.सत्कार समारंभ यशस्वी करण्यासाठी शाळा समितीचे पदाधिकारी व सदस्य वामिना थेर, संगीता तरोणे, माधो तवाडे, मंगेश हेमने,, अंजिरा बहेकार, मंगलाबाई बोरकर यांनी सहकार्य केले.