राजुरा तालुका पत्रकार संघ राजुरा चा पुरस्कार जाहीर
कोरपना :- दरवर्षी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्त राजुरा तालुका पञकार संघातर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारास पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा स्वर्गीय सुरेन्द्र डोहे स्मृती प्रित्यरथ देण्यात येणारा नामांकित पत्रकारीता पुरस्कार दै सकाळ चे कोरपना तालुका प्रतिनिधी सिध्दार्थ घनश्याम गोसावी यांना जाहीर झाला आहे. ८ जानेवारी रोजी राजुरा येथे आयोजित कार्यक्रमात खासदार बाळुभाऊ धानोरकर, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार सुभाष धोटे,शेतकरी नेते व माजी आमदार अँड वामनराव चटप, माजी आमदार अँड संजय धोटे, सुदर्शन निमकर याच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. या आधी सिध्दार्थ गोसावी यांना सामाजिक क्षेञात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सिद्धार्थ गोसावी हे पत्रकारी सोबत सामाजिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी केली आहे ते आदर्श ग्रामविकास सेवा मंडळ पिपर्डा या सामाजिक संस्थेतुन शैक्षणिक सुक्ष्म नियोजन, पाणलोट, जलस्वराज्य, महिलांच्या आर्थिक उन्नती करीता महिला बचत गटांना उद्योग धंदा विषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले आहे. अंबुजा सिमेंट फाउंडेशन च्या वतीने एच. आय. व्ही एड्स विषयी जाणीव जागरुती व कोरपना तालुक्यातील काही निवडक गावातील शेतकऱ्यांना वाडी प्रकल्पाच्या माध्यमातून शेतात फळ झाडे लावून उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केला आहे. कोरपना तालुका प्रेस क्लब चे सचिव व नगीनाबाग चंद्रपुर येथील दि लिटल फ्लॉवर कान्वेट इंग्लिश स्कूल चे उपाध्यक्ष आहेत. मागील दोन दशकभरापासुन सांस्कृतिक,शैक्षणिक,सामाजिक चळवळीत ते सक्रिय आहेत.
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. तळागळातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करत असतात. कोरपना तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने मांडत राहील. समाजातील कष्टकरी घटकांच्या समस्या मांडणाऱ्यांना निश्चितच प्रोत्साहन देणारा हा पुरस्कार आहे. असे मत पुरस्कारार्थी सिध्दार्थ गोसावी यांनी व्यक्त केले. राजुरा तालुका पत्रकार संघ राजुरा, कोरपना तालुका प्रेस क्लब कोरपना व मित्रमंडळींनी सिध्दार्थ गोसावी यांचे अभिनंदन केले आहे.