निवेदनातून तीव्र आंदोलनाचा इशारा
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ५० व्यक्तींनाच समारंभ घेण्यास परवानगी दिल्याने, कॅटर्स, डेकोरेशन, मंडप, इलेक्ट्रिक यासारख्या समारंभावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायिकांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. किमान पाचशे लोकांच्या कार्यक्रमाची परवानगी द्यावी. अन्यथा आम्ही येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करू असा इशारा भद्रावती येथील व्यवासायिक संघटनांनी आज तहसील कार्यालयावर काढलेल्या मूक मोर्चाच्या माध्यमातून भद्रावती चे तहसीलदार महेश शितोळे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री,पालकमंत्री,जिल्हाधिकारी,खासदार बाळू धानोरकर, आमदारधानोरकर, अनिल धानोरकर यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बांधलेल्या नियमामुळे सर्वाधिक फटका हा समारंभांना बसतोय. तसाच तो त्यावर अवलंबून असणा-या व्यवसायांनाही बसतो आहे. समारंभ पार पाडण्यासाठी महत्वाचे घटक असलेल्या केटरिंग आणि डेकोरेशनचे व मंगल कार्यालय,बिछायात,फोटोग्राफर, वाजंत्री आदी व्यावसायिक देखील या नियमांमुळे अडचणीत आले आहेत. तर या व्यवसायांवर अवलंबून असणा-या अनेक कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. शहरात २० ते २५ मंगल कार्यालय, त्यावर अवलंबून असलेले मंडप डेकोरेशन इलेक्ट्रिक सिस्टिम, ८० ते ९० केटरिंग व्यवसाय, असे शेकडो व्यवसायिक आहेत. परंतु, सरकारने अद्याप समारंभाला परवानगी न दिल्याने या सर्व व्यावसायिकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. मार्च महिन्यापासून लॉकडाऊन झाल्याने या व्यावसायिकांना आजपर्यंत कुठलाही व्यवसाय करता आला नाही. त्यामुळे ऐन सिजनमध्ये कोरोनाच्या लॉकडाऊनचा मोठा फटका केटरिंग आणि डेकोरेटर्स या व्यवसायांना बसला. मागणीच नसल्याने व्यवसायिकांचे साहित्य धूळ खात पडून आहे.व्यवसायात नव्याने आलेल्या व्यावसायिकांवर बँकेचे कर्ज डोक्यावर चढले आहे. काही व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायात नवीन सामग्री खरेदी करून पुढील वर्षात आपण चांगला व्यवसाय करू ही मनीषा बाळगली होती. सिजनमध्ये कामगार उपयोगी येतील या अपेक्षेने आठ महिने कामगारांना सांभाळले. मात्र, कोरोनामुळे सर्व नियोजन धुळीस मिळाल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. या आठ महिन्यात त्यांच्याकडे काम करत असलेल्या कामगारांना सतत आर्थिक मदत केली. परंतु आता ती करणेसुद्धा शक्य नाही. अशी सर्वांची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने निर्णय घ्यावा, अनलॉक पाच नंतर सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्ट या सर्वांना परवानगी दिली. परंतु, समारंभाला फक्त पन्नास लोकांची परवानगी सरकारने दिली आहे. ती ५०० लोकांसाठी करावी अशी मागणीही या क्षेत्रातून होत आहे. व्यवसायावर अनेक परिवारांचा उदरनिर्वाह देखील अवलंबून आहे. सणासुदीचे दिवस जवळ आले आहे. परंतु या कामगारांना द्यायला आता या व्यावसायिकांकडे कुठलीही गंगाजळी शिल्लक राहिली नाही. सरकारने नियमावली बांधून या व्यावसायिकांना आता परवानगी देण्याची जास्त गरज झालेली आहे.सरकारने येणाऱ्या १५ दिवसात सहानुभूतीने आमचा विचार करावा नाहीतर याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही जिल्हास्तरावर करू असेही या निवेदनातून त्यांनी केले आहे.निवेदन देतानी कॅटेरिग व्यवसाय चे अध्यक्ष हनुमान धोटेकर, डेकोरेशन संघटनेचे अध्यक्ष किशोर खंडाळकर,मंगल कार्यालय संघटने चे अध्यक्ष मनोज घोडमारे, विशाल बोरकर,किशोर बूजाडे,संजय डोंगरे इत्यादी होते.