सतई कुटुंबीयांवर दु:खाचा मोठा डोंगरच कोसळला
काटोल- पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरच्या गुरज बाधिपुरा सेक्टरवर हल्ला केला. या हल्ल्यात नागपूर जिल्ह्यातील काटोल निवासी भूषण रमेश सतई हा जवान शहीद झाला. ही घटना 13 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी दोनच्या सुमारास जम्मू काश्मिरातील सीमेवर घडली.
28 वर्षीय भूषण सतई गेल्या 9 वर्षांपासून भारतीय सैन्यातील 6 मराठा बटालियनमध्ये कार्यरत होता. देशभक्तीने ओतप्रोत असलेला भूषण नेहमीच पुढे जात शत्रूचा सामना करीत असे. लढवय्या वृत्तीचा अन् न डगमगणारा असा माझा मुलगा देशाच्या संरक्षणासाठी शहीद झाला हे एैकून धक्का बसला आहे. परंतु देशासाठी प्राणपणाने लढणार्या माझ्या भूषणवर मला गर्व असल्याचे मोठ्या अभिमानाने त्याचे पिता रमेश सतई यांनी म्हटले आहे.
रमेश सतई हे मजुरीचे काम करतात. लहानपणापासूनच भूषणला सैन्याची ओढ होती. त्यानुसार तो सैन्यात भरती झाला होता. हाच भूषण सीमेवर शत्रूशी लढताना शहीद झाल्याची वार्ता काटोलमध्ये येताच सर्वत्र खळबळ उडाली. अनेकांनी सतई कुटुंबीयांची भेट घेत त्यांना सांत्वना दिली. ऐन दिवाळीत कर्ता मुलगा असा गेल्याने फैलपुरा काटोल निवासी सतई कुटुंबीयांवर दु:खाचा मोठा डोंगरच कोसळला आहे.