प्रशिक्षण केंद्रामुळे बौद्धिक विकास आणि हॅपीनेस फॅक्टरमध्ये वाढ
नागपूर :
महानिर्मितीच्या मनुष्यबळाला आकार देण्यासाठी कोराडी प्रशिक्षण केंद्र अतिशय उत्तमरित्या काम करीत आहे. आता यापुढे जाऊन, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि वीज क्षेत्रातील ज्वलंत समस्या-प्रश्नांवर आय.आय.टी. मुंबई, निरी नागपूर,सी.पी.आर.आय. बंगळुरू आणि इतर नावलौकिक अभियांत्रिकी व्यावसायिक तज्ज्ञ संस्थांच्या सहकार्यातून संशोधन आणि विकासात्मक कामे करणे गरजेचे असल्याचे मत ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत यांनी व्यक्त केले. कोराडी प्रशिक्षण केंद्रातील हेल्थ क्लबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
प्रशिक्षणार्थीना बौद्धिक विकासासोबत आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी हेल्थ क्लब निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. कोराडी प्रशिक्षण केंद्राचा परिसर सभोवताली पाण्याने वेढलेला असल्याने येथे जैव विविधता पार्क उभारून हा परिसर अधिक हिरवागार करण्यात यावा तसेच आगामी काळात कोराडी येथे ऊर्जा पार्क उभारण्यात येणार असल्याने कोराडी प्रशिक्षण केंद्राला तंत्रज्ञानाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार आहे. पर्यटकांनी ह्या प्रशिक्षण केंद्राला भेट दिली पाहिजे अशी योजना आखण्याचे निर्देश त्यांनी दिले. हेल्थ क्लबमध्ये टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, योगासन, जीम इत्यादी बाबींचा समावेश आहे.
प्रारंभी, महानिर्मितीचे संचालक(संचलन) राजू बुरडे यांनी संविधानाची प्रत देऊन ऊर्जामंत्र्यांचे स्वागत केले तर कोराडी प्रशिक्षण केंद्राच्या विविध उपक्रमांची तपशीलवार माहिती मुख्य अभियंता दिलीप धकाते यांनी संगणकीय सादरीकरणातून दिली. या प्रसंगी सौ.सुमेधा राऊत, मुख्य अभियंते राजेश पाटील, राजकुमार तासकर, प्रकाश खंडारे, अनिल आष्टीकर, अधीक्षक अभियंता आनंद मेश्राम, राजेंद्र करवाडे, सुरेश जग्यासी, विनोद राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
कोराडी प्रशिक्षण केंद्राची वैशिष्ठ्ये
केंद्रीय विद्युत प्राधिकरण अंतर्गत मान्यता प्राप्त केंद्र
अभ्यासक्रम - ५१ रिफ्रेशर, २१ इंडकशन, २ व्हॅकेशन
तज्ज्ञ प्रशिक्षक, ई-लायब्ररी, हेल्थ क्लब, ऊर्जा संवर्धन
सभागृह, प्रशस्त वर्ग खोल्या, ५५ निवासी खोल्या
मॉडेल रम, सिम्युलेटर ५०० व ६६० मेगावाट
वार्षिक सुमारे ३००० मनुष्यबळाला प्रशिक्षण, ऑनलाइन परीक्षा यंत्रणा
व्हर्टिकल गार्डन, हिरवागार परिसर