Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर १४, २०२०

वाचनाची प्रेरणा देणारे डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम




✍🏻राजेंद्र रामहरी टेकाडे, काटोल

 भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवस ' वाचन प्रेरणा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.कारण दुर्दम्य इच्छाशक्ती व आत्मविश्वास सारखा उच्चांक गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता.विवेकी विचार,नितळ मन व दिलदार स्वभाव या गुणामुळे अब्दुल कलामांनी विद्यार्थी व विशेषतः युवकांवर भुरळ पाडलेली होती.विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना कलमांनी नेहमीच उत्तरे दिली.आणि आयुष्याच्या शेवटी कधीही न संपणारी पुस्तकांची दौलत शिल्लक ठेवली.
     भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम म्हणायचे, "पुस्तकांच्या सहवासात ज्ञानाबरोबर मला आनंदही मिळाला आहे.ग्रंथ ही माझी मौल्यवान ठेव आहे.युवक वाचतील तर देश वाचेल.आणि युवकांवरील विश्वासामुळेच 'भारत' महासत्ता बनेल असा आशावाद आहे."
         वाचन प्रेरणा दिनानिमित्त अवांतर वाचन, वाचनकट्टा,शुभप्रसंगी व स्वागत समारंभी पुस्तकभेट, गल्ली वाचनालय, फिरते वाचनालय, लेखक भेटी, बौद्धिक ग्रंथाचे पारायण असे उपक्रम राबविणे आवश्यक आहे.हे उपक्रम वर्षभर कार्यान्वित असावेत.यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागेल व आकलनशक्तीत वाढ होण्यास मदत होईल.
       इतिहासाचा मागोवा, वर्तमानाच्या भान व भविष्याचा वेध वाचनांतून घेता येते.बुद्धीच्या व्यायामासाठी वाचन महत्त्वाचे आहे.व्यक्ती शारीरिक सुदृढतेकरिता व आरोग्यासाठी व्यायाम करतो.मात्र  मनाच्या व्यायामाचे काय ? मेंदूचा व्यायाम झाला तर मानवाला प्रफुल्लित वाटते व त्याच्या कार्यक्षमतेत वाढ होत असते.आधुनिक धावपळीच्या युगात मानसिक तणाव दिवसेंदिवस वाढत आहे.यामुळे नकारात्मकतेत वाढ दिसून येते, मात्र नेहमी वाचन करणारा व्यक्ती आयुष्यातील समस्येला संकट म्हणून न बघता त्यात संधी शोधतो.वाचनामुळे जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याचे वेध लागतात.
        व्यक्तिमत्त्व विकासाकरिता 'संवाद कौशल्य' प्रभावी शस्त्र आहे.वाचनामुळे शब्दसंपत्तीत वाढ होऊन शाब्दिक कौशल्यात गती येते.अद्यावत ज्ञान मिळविण्याकरिता , नवीन माहिती प्राप्त करण्याकरिता वाचन मूलभूत प्रक्रिया आहे.मनाची मशागत, एकाग्रता व बुद्धीला धार लावण्याची किमया केवळ  वाचनातून पूर्ण होते.
    आधुनिक युगात सोशल मिडियाचा वापर वाढत आहे.यामुळे वाचन कमी झालेले आहे.मोबाईलमुळे डोळे दुखणे, मेंदू विकार, मानसिक अस्वस्थता असे रोग निर्माण होत आहे.याकरिता प्रत्येक्षात पुस्तकाचे वाचन करणे रामबाण उपाय आहे.यामुळे वाचन करणे सोईचे व सोपे जाते.टिपणे घ्यायला त्रास होत नाही.आणि टिपणे नेहमीकरिता वहीत लिहून ठेवता येते.
     आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घटना केवळ पुस्तक वाचनातून घडलेल्या आहे.याची उदाहरणे इतिहासात दिसून येते.मानवी मनावर नैराश्याचे ढग येते.तेव्हा पुस्तके ही सुर्यप्रकाशाचे कार्य करीत असते.ही ऊर्जा जीवनाच्या वाटेवर यशाला पादाक्रांत करीत राहते.म्हणून पुस्तक माझा जवळचा मित्र आहे, असे डॉ.कलाम म्हणत होते.
     शाळा-महाविद्यालयातून वाचन संस्कृती अबाधित राहण्याकरिता विविधांगी उपक्रम वर्षभर आयोजित करणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करावा असा टास्क देण्यात यावा.शिक्षकांनी सुद्धा स्वतः अधिकाधिक वाचन करावे यामुळे विद्यार्थ्यांना अवांतर माहिती देता येईल.वाचन ही विद्यार्थी  चळवळ होईल.विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळाली तरच त्यांचे व्यक्तिमत्त्व घडेल.आणि भविष्यात देशाला आवश्यक असणारा सर्वगुणसंपन्न युवक मिळेल.आणि भारतरत्न डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिप्रेत असणारा आपला 'भारत' महासत्ता बनेल.

✍🏻 राजेंद्र रामहरी टेकाडे
         काटोल जि.नागपूर
मो.नं: 9145779050
ईमेल: rajetekade@gmail.com

(लेखक शिक्षक व  शिक्षण अभ्यासक आहे.)

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.