मुक्तिपथ तालुका समितीच्या बैठकीत तहसीलदारांचे निर्देश
आरमोरी : तहसील कार्यालयात आयोजित बैठकित मार्गदर्शन करताना तहसीलदार कल्याणकुमार दहाट.
आरमोरी, ता. १ : दारू व तंबाखूमुक्त जिल्हा विकास कार्यक्रम (मुक्तिपथ) तालुका समितीची बैठक स्थानिक तहसील कार्यालयात तहसीलदार कल्याणकुमार दहाट यांच्या अध्यक्षतेखाली ३१ ऑगस्टला पार पडली. या बैठकीत उघड्यावर थुंकणा-यांवर व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदारांनी दिले.
कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण लक्षात घेता प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, तंबाखूचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होत असून यावर प्रतिबंध घालणे महत्वाचे आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी दारू व तंबाखूमुक्त जिल्हा विकास कार्यक्रम तालुका समितीची बैठक पार पडली. या बैठकीत तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व साठवणुकीवर नियंत्रण घालण्यासाठी चर्चा करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक व विक्री करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदार यांनी बैठकीला उपस्थित सदस्यांना केल्या. शहर पातळीवर नगर प्रशासनाने व गाव पातळीवर ग्राम प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. तसेच पोलिस विभागाने पोलिस अधीक्षक यांच्या पत्रानुसार कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना तहसिलदार यांनी केल्या. यावेळी गाव पातळीवर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणा-यांवर कारवाई करण्या संदर्भातील पत्र काढून तालुक्यातील ग्रामसेवकाना देणार असल्याची माहिती संवर्ग विकास अधिकारी यांनी दिली.
यावेळी संवर्ग विकास अधिकारी चेतन हिंवज, सहायक बिडीओ एम. ई. कोमलवार, नगर परिषद कर्मचारी लोकेश तिजारे, नितीन गौरखेडे, मुक्तीपथ तालुका संघटक निलम हरिनखेडे, उपसंघटक प्रकाश कुनघाडकर उपस्थित होते.