नागपूरकरांनी दिली साथ : मोठया प्रमाणात ‘श्रीं’चे घरीच विसर्जन
फक्त १ लाख विसर्जन कृत्रिम तलावात
नागपूर, ता. २ : कोरोनाचा प्रादुर्भावात नागपूरकरांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा आणि शक्यतो श्री गणेशाचे विसर्जन आपल्या घरीच करावे, महापौर श्री संदीप जोशी आणि मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांच्या या आवाहनाला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. यावर्षी दहा झोनच्या १८४ कृत्रिम तलावामध्ये १ लाख २ हजार ६२२ गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले तसेच ६२.५१ टन निर्माल्य जमा करण्यात आली. मागील वर्षी दहा झोनच्या २७६ कृत्रिम तलावात दोन लाख ९२ हजार ७०२ श्रीं चे विसर्जन करण्यात आले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक लाख ८९ हजार ९२० गणपतींचे विसर्जन कमी झाले. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. संजय निपाणे व उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.
यावर्षी नागपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण पुरक गणेश विसर्जन करण्याकरीता नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने सर्व झोन मध्ये कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्याकरीता फायबर टॅंक, जमिनीत खड्डे, सेंन्ट्रींगची टॅंक असे एकुण १८४ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते.
श्री चे विसर्जन पर्यावरण पुरक व्हावे या करीता सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात आली. निर्माल्य गोळा करुन निर्माल्य कलशामध्ये टाकण्याकरीता तसेच श्रीं चे विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करण्याकरीता स्थानिक सेवाभावी संस्थेच्या मदतीने व्यापक प्रचार व प्रसार करण्यात आला. नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील गणपती विसर्जनाकरीता सतत कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी पुढील प्रमाणे कार्यरत होते. पाच नियंत्रण अधिकारी, १० स्वच्छता अधिकारी, ५६ स्वास्थ निरीक्षक, १५१ जमादार ‘श्री’ च्या विसर्जनाकरीता कार्यरत होते. व गोळा केलेले निर्माल्य वाहून नेण्याकरीता झोन क्रं. १ ते ५ करीता मे. ए.जी. इनव्हायरो व झोन क्र. ६ ते १० करीता मे. बी.व्ही.जी. इंडिया. लि. या दोन्ही एजन्सीद्वारे २६२ कर्मचारी व ११० वाहने उपलब्ध करुन देण्यात आले होते. फुटाळा तलावावर व कृत्रिम तलावाच्या लगत निर्माल्य गोळा करण्याकरीता निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती व गणपतीच्या विसर्जनाकरीता म.न.पा चे ५९० कर्मचारी व सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक/कर्मचारी कार्यरत होते. महानगरपालिकेच्या पर्यावरण पुरक श्रीं च्या विसर्जनाला मोठया संख्येने नागरीकांकडून प्रतिसाद मिळाला असून कृत्रिम तलावांमध्ये एक लाख दोन हजार ७२२ गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे. तसेच ६२.५१ टन निर्माल्य जमा करण्यात आले असून झोन निहाय विसर्जना बाबत माहिती खालील प्रमाणे आहे.
झोन क्रं. कृत्रिम तलावांची संख्या निर्माल्य टनामध्ये मूर्ती विसर्जन
लक्ष्मीनगर झोन क्रं. १ ११ २.३६ टन ७६५०
धरमपेठ झोन क्रं. २ ४० ७.३ टन २३३००
हनुमाननगर झोन क्रं. ३ २० १२.६३ टन १३७००
धंतोली झोन क्रं. ४ १७ १०.६८ टन २१६७४
नेहरुनगर झोन क्रं.५ ३० १०.०१ टन ११५३२
गंधीबाग झोन क्रं. ६ १७ ३.८५ टन ४६२१
सतरंजीपूरा झोन क्रं. ७ ०९ ४.९१ टन ५५०५
लकडगंज झोन क्रं. ८ १९ ७.९६ टन ७३४८
आशीनगर झोन क्रं. ९ ०९ १.८९ टन १५१५
मंगळवारी झोन क्रं. १० १२ ०.९२ टन ५८७७
एकूण १८४ ६२.५१ टन १०२७२२
यावेळी गणपती विसर्जनाकरीता स्थानिक सेवाभावी संस्थां ग्रीन व्हिजील फाउंडेशन आणि मर्चंट नेव्ही ऑफीसर्स वेलफेअर असोसिएशनच्या स्वयंसेवकांकडूनही मोलाचे सहकार्य महानगरपालिकेला मिळाले असून नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे यावर्षी श्री चे विसर्जन मोठया प्रमाणात घरच्या घरी किंवा कृत्रिम तलावात करण्यात आलेले आहे.