नागपूर / अरूण कराळे (खबरबात )
नागपूर जिल्हयातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे खाजगी शाळांतील शिक्षकांचे वेतन गेल्या सहा ते सात महीन्यापासून वेळेवर होत नव्हते. ऑगस्ट महिना अर्धा संपूनही जुलै महिन्याचे वेतन होण्याचे चिन्हे दिसत नसल्याने नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेऊन वेतनाचा तिढा सोडविण्याची विनंती केली. पालक मंत्र्यानी निवेदनाची दखल घेऊन सर्व संबंधितांना वेतन तात्काळ करण्याचे आदेश दिले.यावेळी नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागोराव गाणार उपस्थित होते .
मागील आठवड्यात जुलै महिन्याचे रखडलेल्या वेतनाबाबत नागपूर जिल्हा शिक्षण समन्वय समिति मार्फत शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षकांना भेटून वेतनाबाबत माहिती विचारली असता कोषागार कार्यालय अधिकारी यांनी जिल्हयातील अधिसंख्य पदावरील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधी व अन्य काही आक्षेप नोंदविल्याने त्याची पूर्तता लगेच करुन दोन दिवसात वेतन करण्याचे आश्वासन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. शिवलिंग पटवे यांनी दिले होते. परंतु ऑगस्ट महीन्याची १४ तारीख संपूनही जुलै महिन्याचे वेतन झाले नाही. विशेष म्हणजे इतर जिल्हयात अधिसंख्य पदाबाबत कोणतेही आक्षेप कोषागार कार्यालयाने घेतले नसल्याने शिक्षकांचे वेतन झाले. फक्त नागपूर जिल्हयासाठीच कोषागार कार्यालयाकडून आक्षेप का घेतल्या जात आहे असा प्रश्न शिक्षकांना पडला. सणासुदीच्या काळात कोषागार व वेतन पथक यांच्या कैचीत शिक्षकांचे वेतन अडकल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती . त्यामुळे शुक्रवार १४ ऑगस्ट रोजी शिक्षण समन्वय समितीच्या वतीने जिल्हयाचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांना भेटून वेतनाबाबतचा घोळ मिटविण्याची विनंती करण्यात आली. त्यांनी कोषागार अधिकारी, वेतन पथक अधीक्षक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची सभा बोलावून वेतनाबाबतच्या अडचणी समजून घेतल्या. कोषागार कार्यालयाच्या आक्षेपाच्या निराकरणाचे पत्र वेतन पथक कार्यालयाकडून प्रत्यक्ष पालकमंत्र्यासमक्ष सादर केले. त्यावर कोषागार कार्यालयाच्या वतीने समाधान झाल्याचे सांगून सोमवार १७ ऑगस्ट रोजी वेतन अदा करण्याची हमी दिली. शिक्षकांच्या वेतनाचा सुरू असलेला घोळ समक्ष सोडवून घेतल्याने पालकमंत्र्यांचे समन्वय समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी शिक्षण समितीचे मुख्य संयोजक श्री.अनिल गोतमारे, श्री.पुरुषोत्तम पंचभाई, श्री.जयंत जांभुळकर, श्री .अशोक गव्हाणकर, श्री.बाळा आगलावे,श्री. सपन नेहरोत्रा , श्री.नामा जाधव, श्री.विलास केरडे ,श्री.अभिजित पोटले, श्री.भरत रेहपाडे, श्री.सुभाष गोतमारे, श्री.सुधीर वारकर, श्री.अरुण भोयर, श्री.सुनील मने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.