नागपूर ६ ऑगस्ट २०२० : चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना विना अट वीज केंद्रात नोकरी मिळण्यासासाठी काही प्रकल्पग्रस्तांनी चंद्रपूर वीज केंद्राच्या चिमणीवर चढून कालपासून आंदोलन सुरु केले. मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
राज्य शासनाच्या धोरणानुसार प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न धोरणात्मक निर्णय घेऊन सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना आज ६ ऑगस्ट रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फ्रसींगद्वारे बैठकीत सांगितले.
या संदर्भात ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता नागपूर येथील ऊर्जा अतिथीगृह, बिजलीनगर सदर येथे बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्र्यांनी दिले आहे. ह्या बैठकीस चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी तसेच व्ही.सी.द्वारे महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.