नागपूर(ख़बरबात):
आज १० ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास महानिर्मितीच्या सुमारे ४० वर्षे जुन्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील १०५ मेगावाट क्षमतेच्या चार संचांमधील दोन चिमण्या (धुरांडे) तज्ज्ञ संस्थेच्यावतीने जमीनदोस्त करण्यात आले, पाडण्यात आले.
ह्या दोन चिमण्यांची प्रत्येकी उंची ७२ मीटर असल्याने चिमणी पाडताना सभोवतालचा ३० मीटर त्रिज्या परिसर सुरक्षाकड्याने बंदिस्त करण्यात आला होता. सोबतच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रुग्णवाहिका आणि सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले होते.
चिमणीचा ढाचा खाली कोसळल्याने एक लहान खडा सुमारे २०० मीटरवर उडून मेजर स्टोरमधील कंत्राटी सुपरवायझर दिनू काकडे यांच्या डोक्याला लागला आणि किरकोळ जखम झाली. लगेच त्यांना अलेक्सिस हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची कोविड चाचणी करून वैद्यकीय तपासण्या केल्या असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे.