चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 872
24 तासात नव्या 16 रुग्णांची भर
360 बाधितांवर जिल्ह्यांमध्ये सध्या उपचार सुरू
चंद्रपूर, दि. 10 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 872 झाली आहे. जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत कोरोना आजारातून बरे झाल्यामुळे 506 नागरिकांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात 16 नव्या बाधितांची भर पडली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात केवळ 16 नवीन बाधित आले आहेत. गेल्या पंधरवाड्यातील ही कमी संख्या आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तपासण्या वाढविण्यात आल्या असून नागरिकांनी कोणतेही लक्षण दिसल्यास तपासणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. कोरोना रुग्णांची संख्या येत्या काळात वाढणार असून नागरिकांनी मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे शारीरिक अंतर पाळणे व शक्यतो घराबाहेर न निघण्याच्या सूचना पाळाव्यात असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण पुढे येत असल्यामुळे या भागातील नागरिकांनी देखील आपल्या आरोग्याची न खेळता सर्व सूचनांचे पालन करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 33 हजार 584 स्वॅब तपासणी झाली आहे. यापैकी 32 हजार 417 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत 131 अँटीजेन टेस्टसह 741 प्रचलित आरटीपीसीआर स्वॅब पकडता जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 872 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहे.
आज पुढे आलेल्या बाधितामध्ये मुंबई येथून आलेल्या ब्रह्मपुरी शहरातील 25 वर्षीय युवकाचा समावेश आहे. नागभिड तालुक्यातील पुणे येथून परत आलेल्या 25 वर्षीय पुरुष व 21 वर्षीय महिला तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळली आहे. तर आंध्र प्रदेश राज्यातील नेल्लूर येथून आलेली 19 वर्षीय युवती पॉझिटीव्ह ठरली आहे.
चंद्रपूर शहरा नजीकच्या ताडाळी परिसरात बिहार राज्यातून आलेल्या 6 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. याच कामगारांच्या संपर्कात आल्यामुळे अन्य तीन नागरिक देखील पॉझिटिव्ह ठरले आहे.
नागपूर येथून प्रवास करून आलेल्या तुकुम चंद्रपूर परिसरातील 31 व 32 वर्षीय दोन नागरिक पॉझिटिव्ह ठरले आहेत. तर बापट नगर येथील 28 वर्षीय युवक संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे. आज अशाप्रकारे एकूण 16 जण पॉझिटिव्ह म्हणून पुढे आले आहे.