चंद्रपूर येथील नवउद्योजकांनी घ्यावा लाभ
चंद्रपूर,दि. 17 जुलै: महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसायाला चालना मिळावी. व्यवसाय उभारतांना येणाऱ्या अडचणींना सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उद्योग संचालनालयामार्फत एकल खिडकी योजना राबवलेली आहे.उद्योग संचालनालयाने महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल (मैत्री) तयार केलेले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून उद्योगासंदर्भात वेगवेगळ्या विभागाचे विविध परवाने एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. जिल्ह्यातील उद्योजकांनी जास्तीत जास्त या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड यांनी केले आहे.
या पोर्टल मार्फत ज्या नवीन व सध्या सुरू असलेल्या उद्योगांना वेगवेगळ्या विभागाच्या विविध परवाने एकाच ठिकाणी उपलब्ध केल्या जातात.जवळजवळ 12 विभागातील 48 ऑनलाईन मंजुरी आणि परवाने या पोर्टलवर मिळवू शकतात.
या विभागातील मिळणार परवानगी:
उद्योग, कामगार, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वस्तू व सेवा कर नोंदणी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नगरविकास, विधी व न्याय, स्टीम बॉयलर्स संचालनालय, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय या विभागातील 48 मंजुरी आणि परवानगी उद्योजकांना मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी www.di.maharashtra.gov.in तसेच maitri.mahaonline.gov.in वर लॉग ऑन करा किंवा 022-22622322 व 022-22622362 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकता.
00000
स्वयंरोजगारासाठी कौशल्य महत्वपूर्ण : सुशील बुजाडे
रोजगार विषयी मार्गदर्शन वेबिनारचा समारोपीय कार्यक्रम
चंद्रपूर, दि. 17 जुलै: स्वयंरोजगार स्थापन करण्यासाठी अथवा रोजगार मिळण्यासाठी कौशल्य असणारा युवक-युवती कधीही नोकरीविना अथवा कामाविना राहत नाही. असे मत 17 जुलै रोजी रोजगार विषयी वेबीनारद्वारे युवक-युवतींना मार्गदर्शनात जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुशील बुजाडे यांनी व्यक्त केले. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राअंतर्गत 15 जुलै 17 जुलै दरम्यान स्पर्धा परीक्षा व रोजगार विषयक मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. 17 जुलै रोजी मार्गदर्शन वेबीनारचा समारोप होता.
आयटीआय अर्थात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत युवक-युवतींना अनेक कौशल्यावर आधारित तसेच उद्योगावर आधारित शिक्षण दिल्या जाते. या शिक्षणाचा युवक-युवतींना स्वयंरोजगार स्थापन करण्यासाठी अथवा रोजगार मिळण्यासाठी निश्चितच फायदा होतो. याविषयीचे मार्गदर्शन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुशील बुजाडे यांनी जिल्ह्यातील युवक-युवतींना वेबिनारद्वारे केले. या वेबिनारमध्ये जिल्ह्यातील युवक युवतींचा उत्तम प्रतिसाद यावेळी दिसून आला.
यावेळी सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे उपस्थित होते.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी मार्गदर्शन वेबिनारचा समारोप करतांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे देण्यात येणारे विविध अभ्यासक्रमाचा लाभ जिल्ह्यातील युवक-युवतींनी घ्यावा. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशाच प्रकारचे ऑनलाइन वेबिनारद्वारे शिक्षण घेण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.