Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै १२, २०२०

पावनखिंडचा रणसंग्राम

 पावनखिंडचा रणसंग्राम
_________________________
दि. १२ जुलै १६६०
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
_________________________
त्या  रात्री पन्हाळगडच्या वेढ्यातून पलायन महाराज पन्हाळगडाहून निघाले. रात्री दहाचा सुमार होता. आषाढी पौर्णिमेची ही रात्र होती. (दि.१२ जुलै १६६०) पण चंद्र काळ्याकुट्ट ढगांच्या आड लोपला होता.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=200304253700839&id=100011637976439
महाराज पालखीत बसलेले होते. पालखी मावळ्यांनी उचलली. बाजीप्रभू निघाले. ६०० मावळेही निघाले. आणी एक रिकामी पालखीही निघाली. पाऊस, वादळ, विजा अखंड चालू होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. सिद्दी जौहरची छावणी पूर्णपणे गाफील बनलेली होती. शिवाजी उद्यांच शरण येणार आहे ! मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर उभे राहा ? करा उबदार आराम ! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले बनले होते. झाडाझुडपातूंन अन् खोगळ्यांतून महाराजांची पालखी धावत होती.पाऊस पडत होता. आभाळ गडगडत होते. छाताडे धडधडत होती. विजा लखाकत होत्या. पालखी धावत होती. नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. छावणीच्या सांदिसपाटीतून ती पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली.वेढापासून पालखी पुष्कळच दूर गेली. एवढ्यात घात झाला ! जौहरच्या हेरांनी पालखी ओळखली. आता ? त्या रिकाम्या पालखीत आता एक महाराजांसारखा दिसणारा एक जवान बसला. ती पालखी घेऊन १५ - २० लोक मुख्य रस्त्याने धाऊ लागले. आणि महाराजांची पालखी बाजी प्रभुंनी एकदम आडमार्गाने विशाळगडाकडे न्यायला सुरूवात केली.शत्रुचा पाठलाग अटळ होता. अन् खरोखरच जौहरची फौज सिद्दी मसाउदच्या बरोबर पाठलागावर निघाली. एकदम त्यांनी पालखीला गराडले. त्यांनी मावळ्यांना विचारले की, आत कोण आहे ? उत्तर मिळाले की पालखीत शिवाजी राजे आहेत. पालखी सकट महाराज कैद झाले अन् सिद्दीच्या छावणीत दाखल झाले. सिद्दीसमोर मान खाली घालून उभे राहिले. पण जाणकारांनी ओळखले ! काही गडबड आहे. चौकशी झाली. अन् कळले - की हा तर शिवा न्हावी आहे. ताबडतोब स्वराज्याच्या त्या शिलेदारांची गर्दन उडाली.पुन्हा सिद्दी मसाऊद पाठलागावर निघाला. नुसताच मनस्ताप - पश्चात्ताप - चिडचिड आणि वडवड. घोड्याला टाच मारून आवघे एल्गारत निघाले...वाटेतील गुढगा - गुढगा चिख्खल तुडवीत.
🔹१२ जुलै १६६०
पावनखिंड – आषाढ शुद्ध पौर्णिमा , गुरुपोर्णिमा बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली " पावनखिंड ". जेथे बाजीप्रभूंनी देह ठेवला. जेथे त्यांनी मृत्यूला सुधा ओशाळविले.जीवनबाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. शिवाजीराजांना विरोध करणार्‍या बांदलांचे बाजी दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली.
पावनखिंडीचा लढासिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. त्या वेळी, आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापूरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली. सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणार्‍या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना १३ जुलै, इ.स. १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे. घोडखिंडीतला हा लढा मराठ्यांच्या इतिहासात पराक्रमाची शर्थ मानला जातो.प्रभावमराठ्यांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली, म्हणूनच तिला पावनखिंड संबोधले जाऊ लागले. बाजी - फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजी प्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजी प्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.
लेखक:-सूरज बबन थोरात


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.