अर्जुनीमोर तालुक्यात 3 कोरोना बाधीत
संजीव बडोले/
प्रतिनिधी, नवेगावबांध.
नवेगावबांध दि.31जुलै:गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानुसार वडेगाव रेल्वे येथील दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले आहे. त्यामुळे या गावाला आज दिनांक 31 जुलै रोज शुक्रवारला कोअर झोन घोषित करण्यात आले. तर परिसरातील तीन गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आता तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या तीन एवढी झाली आहे .
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव रेल्वे येथील दोन मूळनिवासी व्यक्ती दिनांक 25 जुलै रोजी सायंकाळी ओडीसा राज्यातून स्वतःच्या खाजगी वाहनाने प्रवास करून घरी आले. त्यांना दिनांक 25 जुलै येथे 28 जुलै पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडेगाव रेल्वे येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर सदर दोन्ही व्यक्तीस 28 जुलै पासून कोविड केअर सेंटर नवेगावबांध येथे चाचणी करता आणण्यात आले होते. सदर व्यक्ती चे दिनांक 29 जुलै रोजी कोविड केअर सेंटर नवेगावबांध येथे घशाचे नमुने विषाणु प्रयोगशाळा गोंदिया येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल काल दिनांक 30 जुलै रोज गुरुवारला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा आला. वडेगाव रेल्वे या गावास ईपीक सेंटर बनवून कन्टोनमेंट प्लॅन कार्यान्वित करण्याकरिता कोरोना आजाराच्या प्रतिबंध करिता प्रतिबंधित क्षेत्रामध्ये येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ प्रभावाने बंद करून सदर भागाच्या सीमा आवागमनासाठी बंद करण्यात आले आहे.तालुक्यातील भिवखीडकी पाठोपाठ वडेगाव रेल्वे येथे दोन व्यक्तीकोरोना बाधित आढळल्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कोरोणापासून दूरअसलेला अर्जुनी मोरगाव तालुका कोरोना बाधित झाला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या दोन व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल कोरोना बाधित असल्याचा आल्यामुळे वडेगाव रेल्वे या गावाचा कोअर झोन( कन्टोनमेंट झोन) मध्ये समावेश करण्याची घोषणा आज दिनांक 31 जुलै रोज शुक्रवारला अर्जुनी मोरगाव च्या उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी शिल्पा सोनाले यांनी एका आदेशान्वये जाहीर केले आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव इतर भागात पसरू नये याकरिता, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच नागरिकांचे हीत व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून covid-19 विषाणूचा संसर्ग टाळण्याकरता मौजा वडेगाव रेल्वे येथे कोअर झोन प्रतिबंधित क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या क्षेत्रात जाणारे येणारे सर्व मार्ग तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आले आहे. तसेच आवागमनास सीमा बंद करण्यात आलेले आहे. सदर क्षेत्रातील लोकांना बाहेर जाण्यास व बाहेर क्षेत्रातील लोकांना इथे प्रवेश करण्यास पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. तर कन्हाळगाव, बुधेवाडा, घाटी पळसगाव ही गावे बफर झोनमध्ये मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
आज 31 जुलै रोज शुक्रवार ला अर्जुनी मोरगाव च्या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शिल्पा सोनाले यांनी वडगाव रेल्वे येथील गाव समिती ची सभा घेण्यात आली. या सभेत कोअर झोनमध्ये करण्यात येणाऱ्या उपाययोजना विषयी चर्चा केली व मार्गदर्शन केले. यावेळी अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार विनोद मेश्राम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय राऊत ,खंडविकास अधिकारी मयूर आंदेलवाड, अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तोंदले तसेच सरपंच ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी व गाव समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.