टेलिफोनिक कॉन्सिलिंग सुरू;
नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
चंद्रपूर,दि.22 जुलै: कोरोनाच्या काळामध्ये नागरिकांना कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रम आत्मभान अभियानांतर्गत सुरू आहे. नागरिकांना मानसिक दडपण येऊ नये, ताणतणावाचे नियोजन याविषयीची माहिती, समस्यांचे निराकरण, नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी आत्मभान अभियानांतर्गत टेलिफोनिक कॉन्सिलिंग सुरू झाली आहे. हॅलो चांदा 155-398 या हेल्पलाइन क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत संपर्क साधून मानसिक आरोग्य संदर्भातील अडचणी दूर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांच्या मानसिक समस्यांचे निराकरण, ताणतणावाचे व्यवस्थापन प्रशिक्षित समुपदेशकांमार्फत टेलिफोनिक कॉन्सिलिंगद्वारे सोडविण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रसार बघता नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या बरोबरच मानसिक समस्या देखील वाढत आहे. मानसिक समस्याग्रस्त नागरिकांना आधार देणे गरजेचे आहे. टेलिफोनिक कॉन्सिलिंगच्या माध्यमातून मानसिक समस्या सोडविण्यासाठी मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात जनजागृती विषयक आत्मभान अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गतच नागरिकांमध्ये असणारे मानसिक आरोग्य विषयीची समस्या, त्यांच्यामध्ये असणारी चिंता सोडविण्यासाठी मानसिक आरोग्य विषयीची हेल्पलाइन अर्थात टेलिफोनिक कॉन्सिलिंग सुरू करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने लोकांच्या वाढत्या समस्यांचा विचार करता हॅलो चांदा या हेल्पलाईनची सुरूवात केली आहे. जेणे करून नागरीकांना आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी 155-398 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपल्या समस्यांचे निवारण करता येईल.
जिल्ह्यातील नागरिकांनी मानसिक समस्या संदर्भात कोणतीही घुसमट न ठेवता हॅलो चांदा 155-398 या हेल्पलाइन क्रमांकावर निसंकोचपणे आपल्या समस्या मांडा व समस्येचे निराकरण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.