जुन्नर / वार्ताहर
शिवजन्मभूमी कोरोनापासून अलिप्त होती. अखेर शिवजन्मभूमीत कोरोनाचा रुग्ण सापडला. जुन्नर शहराच्या मध्यवस्तीतल्या एका हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या वकिलांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ३२ वर जाऊन पोहोचली आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत तालुक्यात एक जण मृत्युमुखी पडला असून २१ रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. सध्या दहा अॅक्टिव्ह रुग्ण तालुक्यात आहेत. जुन्नर शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने नगर पालिकेने हा परिसर प्रतिबंधित करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात कोण आले, याचीही माहिती घेतली जात असून त्यांचीही स्वॅब तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
संबंधित व्यक्ती जळगावला जाऊन आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. तेथून आल्यानंतर ही व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तालुक्यात कुसूर आणि धामणखेल या दोन गावांतही प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आढळला आहे. मात्र, तालुक्यातील एकवीस कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने प्रशासनाला तेवढाच दिलासा मिळाला आहे. औरंगपूर येथे एका कोरोना रुग्णाचा मृत्यु झाला असून परिसरातील दहा अॅक्टिव्ह रुग्णांपैकी लेण्याद्रीच्या कोविड केंद्रात ४, पुण्यात औध येथे २, पिंपरीच्या वायसीएममध्ये ३ व रुबी हाॅल क्लिनिकमध्ये एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.
लेण्याद्रीच्या रुग्ण्यालयात गुरुवारी ज्या आठ जणांचे स्वॅब घेतले होते ते सर्व निगेटिव्ह आहेत. एकूण ३५६ नमुने पुण्यात तपासणीला पाठवण्यात आले आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. शाम बनकर यांच्या देखरेखीखाली हे कोविड सेंटर सुरु झाले आहे. तालुक्यात ४०३१ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी १०९ संस्थात्मक तर ३९२२ होम कोरंटाईन झालेले नागरिक आहेत.