राज्यातील प्राथमिक शिक्षकांना आरोग्य व पोलीस कर्मचाऱ्या प्रमाणे कोरोना प्रतिबंधात्मक कामे दिली जात आहे मात्र त्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे विमा संरक्षण लागू करण्यात आले नाही अश्या मध्ये नुकतेच दोन शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आतातरी विमा संरक्षण लागू करावे अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने शासनाकडे पाठवलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नुकतेच सांगली जिल्ह्यातील शिक्षक नानासाहेब कोरे यांना पोलीस मित्र सेवा देतांना भरधाव ट्रक ने चिरडले व जळगाव जिल्ह्यातील एस.एस.कोळी यांचा रेशनिंग च्या दुकानात सेवा देतांना कोरोना लागण लागून दुर्दैवी मृत्यू झाला, याशिवाय अनेक शिक्षकांना सेवा देतांना मारहाण व शिवीगाळ झाली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये कोरोना सेवा देतांना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
कोरोना उपाययोजना कार्यात सेवा देत असलेल्या डॉक्टर, नर्स व पोलीस कर्मचारी यांना 50 लाख तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण शासनाने मागेच जाहीर केले आहे. राज्यातील शासकीय व खाजगी व्यवस्थापनातील प्राथमिक शिक्षकांना सुद्धा पोलीस मित्र, रुग्ण सहायता कक्ष, रुग्ण सर्वेक्षण व मार्गदर्शन, स्थलांतरित सर्वेक्षन, रेशनिंग नियंत्रण, कोरोन्टीन केंद्र देखभाल अशी ग्रामीण व शहरी पातळीवरील कामे देण्यात आली आहे, यात शिक्षकांचा सामना थेट कोरोना बाधित रुग्णांशी होत आहे करिता त्यांना सुद्धा विमा संरक्षण गरजेचे आहे. मात्र ते अद्यापही लागू करण्यात आले नाही पुरोगामी शिक्षक संघटनेने याबाबत शासनाला तीन वेळा पत्रव्यवहार केला आहे.
करिता कोरोना सेवेतील अन्य शिक्षकांसोबत दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी राज्यातील प्राथमिक शिक्षकांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण लागू करावे अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मा.मुख्यमंत्री, मा.ग्रामविकास मंत्री, मा.शिक्षण मंत्री व मा.आरोग्य मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनाच्या माध्यमातून संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, विजय भोगेकर, अल्का ठाकरे, चंदा खांडरे यांनी केली आहे.