Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे ०६, २०२०

कामे होत नसेल तर रजेवर जा; आमदारांनी भरला दम




पण येवलेकरांच्या आरोग्याशी खेळू नका!

आमदार किशोर दराडेंचा शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत इशारा,दुर्लक्ष करणाऱ्यांची कानउघाडणी


प्रतिनिधी , विजय खैरनार
येवला : मालेगाव नंतर सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण येवल्यात सापडले असूनही काही अधिकारी मात्र वेळकाढूपणा करत आहेत.एकमेकांत समनव्य नसून कोणत्याही कामात चालढकल सुरू आहे.त्यामुळे कुणाकडून काम होत नसेल तर ते करू नका,रजेवर निघून जा पण येवलेकरांच्या आरोग्याशी खेळू नका असे आवाहन करतांनाच रुग्ण संख्या वाढू नये याची काळजी घेण्याची सूचना आमदार नरेंद्र दराडे आणि आमदार किशोर दराडे यांनी केली.

उर्मटपणे वागणाऱ्या व बेजबाबदारपणे उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी येथील प्रांत कार्यलयात विविध विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बोलविलेल्या बैठकीत आमदार दराडे बंधू आणि तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.बैठक सुरू होण्यापूर्वीच तहसीलदार प्रांत कार्यालयात आल्यानंतर आमदारांबरोबर आलेल्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना पाहून तहसीलदारांनी रुद्रावतार धारण करत आमदार नरेंद्र दराडे यांच्यासमोरच गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली.यानंतर बैठकीला आलेल्या आमदार किशोर दराडे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामे करायची नसेल तर थांबू नका असा इशाराच अधिकाऱ्यांना दिला.

येथील प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी ज्योती कावरे यांच्या उपस्थितीत आमदार नरेंद्र दराडे आणि आमदार किशोर दराडे या दोघा आमदार बंधूंनी शासकीय अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी दुपारी १२ वाजता बोलावली होती.बैठकीला तहसीलदार रोहिदास वारुळे हे प्रांत कावरे या येण्यापूर्वीच हजर झाले, मात्र त्यापूर्वीच आमदार नरेंद्र दराडे हे बैठकीला आलेले होते.आमदार दराडे बंधूनी शहर व तालुक्यातून शिवसेनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना त्यांच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या समस्या असतील त्या घेऊन बोलविले होते.

तहसीलदार वारुळे यांच्याकडे प्रांत कार्यालयात आमदार समर्थकाने कोरोंटाईन केलेल्या रुग्णांना चहापाणी व नाश्ता मिळत नसल्याची तक्रार केली.यावर तहसीलदार हे संतप्त झाले.त्यांनी आम्ही बाहेर राहून काय करतोय हे तुम्हाला काय माहीत ,घरी बसता आणि आम्हाला विचारतात असा सवाल करून वारुळे यांनी आमदार नरेंद्र दराडे यांच्यासमोरच रुद्रावतार धारण केला.तुम्हाला येथे मिटींगला कुणी बोलावले ,नाव सांगा तुमच्यावर गुन्हेच दाखल करतो अशी धमकीवजा इशाराच शिवसेना उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे ,तालुकाप्रमुख रतन बोरणारे आणि उपस्थित लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाहत तहसीलदार यांनी दिला.मी मिटिंग घेणार नाही असेही उत्तर तहसीलदार वारुळे यांनी आमदारांसमक्ष दिले.तहसीलदारांनी रुद्रावतार धारण केलेला असतांनाच मग प्रांत ज्योती कावरे आणि त्यानंतर आमदार किशोर दराडे यांचे आगमन झाले. प्रांतांसमोरही तहसीलदार वारुळे हे शांत झाले नाहीत.यानंतर प्रांत कावरे यांनी त्यांच्या दालनात ५ जणांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात केली. बैठकीत आमदार किशोर दराडे यांनी गुन्हे कुणावर दाखल करतात याचा जाब तहसीलदारांना विचारला.कुणाशी आपण गुन्ह्याची भाषा बोलत आहात असा प्रश्न करीत आमदार किशोर दराडे यांनी लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे,लोकांना ज्या समस्या ,अडचणी असतील त्या तुम्हा अधिकाऱ्यांना नाही विचारायचे तर कुणाला विचारायचे असा सवाल केला.कोरोनात प्रत्येक अधिकाऱ्याची काय जबाबदारी आहे याचा प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतांना दराडे बंधूनी अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले.शहरात कोरोनाबधित रुग्ण ची संख्या वाढतच चाली असतानी ही पालिकेकडून फवारणी केली जात नाही.बाभूळगाव येथे कोरोनाबधित रुग्ण ठेवलेले असताना किती वेळेस फवारणी केली जाते यासह अनेक प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर झाले.

तहसीलदार ,मुख्याधिकारी ,पोलीस निरीक्षक,गटविकासअधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्यात पॉझिटिव्ह परिस्थिती असतांना समन्वय नसल्याची तक्रार आमदारांनी प्रांतांकडे केली.कोरोनाबधित रुग्णांची संख्या वाढत चाललेली असतांना आता काय संपूर्ण येवल्याला कोरोनाची लागण करायची आहे का असा सवाल बैठकीत आमदार किशोर दराडे यांनी अधिकाऱ्यांना केला.

आमदार दराडेचा रुद्रावतार..
बैठकीच्या सुरुवातीला काही अधिकारी उपस्थित नव्हते गटविकास अधिकारी डॉ उन्मेष देशमुख ,तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी हे उशिरा आले.त्यावर आपल्याला बैठक किती वाजता होती माहीत नव्हती का असा सवाल आमदार दराडे यांनी केल्यानंतर आम्हाला तहसीलदार यांनी मी बोलविल्याशिवाय बैठकीला येऊ नका असे संगीतल्यानेच बैठकीला उशीर झाल्याचे सांगताच बैठकीचा नूरच बदलला.तहसीलदार वारुळे यांनी अधिकाऱ्यांना बैठकीला मी बोलविल्याशिवाय येऊ नका असा मेसेज टाकल्याची तक्रार बैठकीत आमदारांनी प्रांत यांच्याकडे करीत पुरावे सादर केले. यानंतर बाभूळगाव येथील कोरोनाबधित रुग्ण हलविण्यासंदर्भात दराडे यांनी प्रांत यांच्यासमक्ष आरोग्य अधिकाऱ्यांना विचारले.किती रुग्ण हलविले असे आमदार किशोर दराडे यांनी विचारताच तहसीलदार वारुळे आणि आमदार किशोर दराडे यांच्यात खडाजंगी झाली.पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्याकडे निर्देश करीत यांनी रात्रीच रुग्ण हलविला आहे.मग तुम्हाला कसे काय माहीत नाही असा सवाल तहसीलदारांना दराडे यांनी करताच तहसीलदार यांनी मी झोपेत होतो असे उत्तर दिले.या उत्तराचा राग येऊन आमदार दराडे आणि तहसिलदारांमध्ये चांगलीच झुंपली. तहसीलदार वारुळे यांनी तुम्ही काहीही गैरसमज करून घेऊ नका ,मी काय तुमचा नोकर नाही असे उत्तर दिले.अखेर प्रांत कावरे यांनी तहसीलदारांना खडे बोल सुनावले. प्रांत कावरे यांनी मग आमदार दराडे यांनी सुचविलेल्या सूचनांवर अंमलबजावणी करण्याचे आदेश उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना दिले आणि कुचराई केल्यास प्रांतांनी कारवाईचा इशाराही दिला.बैठकीला तहसीलदार रोहिदास वारुळे ,मुख्याधिकारी संगीता नांदूरकर ,गटविकास अधिकारी उन्मेष देशमुख ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ हितेंद्र गायकवाड ,पोलीस निरीक्षक संदीप कोळी ,अनिल भवारी, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर ,उपनगराध्यक्ष सूरज पटणी, नगरसेवक प्रमोद सस्कर उपस्थित होते.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.