चंद्रपूर(खबरबात)
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सकाळी दोन वेगवेगळ्या दुर्दैवी घटनांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (इन्स्टिट्यूशनल कारेन्टाइन )अलगीकरण कक्षात दोघांचा मृत्यू झाला.
यापैकी चंद्रपूर येथील श्याम नगर भगतसिंग चौक येथील रहिवासी असणाऱ्या ३० वर्षीय युवकाने सकाळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहातील अलगीकरण कक्षात ७.३०च्या सुमारास आत्महत्या केली. हा युवक नागपूर येथून आल्यानंतर अलगीकरण कक्षामध्ये होता.
दुसऱ्या घटनेत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निवासी कक्षामध्ये
( शासकीय निवासस्थान ) आपल्या कुटुंबासह अलगीकरणात असणार्या ४० वर्षीय नागरिकाचा प्रकृती अस्वास्थामुळे आकस्मिक मृत्यू झाला. मूळचे यवतमाळ जिल्हयातील वणी तालुक्यातील शिरपूर गावाचे आहे. त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत यावेळी होते. त्यांची प्रकृती स्थिर होती. कुटुंबासोबत त्यांचा सकाळी संवादही झाला. सकाळी साडेसातला ते आराम करत होते.झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दोन्ही मृतकांचे कोरोना स्वॅब देखील घेण्यात येणार आहेत.
या दोन्हीही रुग्णांची प्रकृती स्थिर होती. दोन्हीही रुग्ण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या इमारतीमध्ये अलगीकरणात होते. या दोन्ही ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार , मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, अतिरिक्त पोलीस अधिकारी प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.