महावितरणकडून राज्यभरात कार्यान्वित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील तीन किंवा पाच एचपी क्षमतेचे सौर कृषिपंप तांत्रिक बिघाडासह वादळी पाऊस, गारपिट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नादुरुस्त झाल्यास ते पूर्णपणे मोफत दुरुस्त करून किंवा बदलून देण्यात येणार आहे.
सध्या राज्यात वादळी पाऊस व गारपिटीचा धोका आहे. अनेक ठिकाणी वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला आहे. यामध्ये सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त होण्याची शक्यता आहे. नादुरुस्त झालेले सौर कृषिपंप नियमानुसार मोफत दुरुस्त करण्याचे किंवा बदलून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा तसेच शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा व्हावा, यासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणची नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेनुसार पहिल्या टप्प्यातील २५ हजार आणि दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित ७५ हजार सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सध्या महावितरणने पहिल्या टप्प्याचे उद्दीष्ट पूर्ण करीत राज्यभरात तीन व पाच एचपी क्षमतेचे २५ हजार सौर कृषिपंप कार्यान्वित केले आहेत. तर उर्वरित ७५ हजार सौर कृषिपंपाचे काम प्रगतीपथावर आहे.
महावितरणच्या स्वतंत्र वेबपोर्टलद्वारे 'ऑनलाईन' अर्ज स्विकारण्यात आल्यानंतर निवड झालेल्या शेतकऱ्यांकडून लाभार्थी हिस्सा भरल्यानंतर निवड सूचीतील एजंसीची निवड करण्यात येत आहे. या एजंसीमार्फत शेतकऱ्यांना सौर कृषिपंप कार्यान्वित करण्याचे काम करण्यात येत आहे.
महावितरणने एजंसीसोबत केलेल्या करारानाम्यानुसार शेतकऱ्यांकडे आस्थापित करण्यात आलेल्या सौर कृषिपंपाच्या देखभाल व दुरूस्तीसाठी ५ वर्ष तर सौर पॅनलसाठी १० वर्षांचा हमी कालावधी ठरविण्यात आला आहे.
या हमी कालावधीत सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरूस्त झाल्यास त्याची मोफत दुरुस्ती करण्याची किंवा सौर कृषिपंप पूर्णपणे बदलून देण्याची जबाबदारी संबंधीत एजन्सीची राहणार आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या वादळी पावसामुळे किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास सौर कृषिपंपाची दुरुस्ती किंवा बदलून देण्यासाठी संबंधीत शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप नादुरुस्त झाला असल्यास किंवा सौर पॅनलमध्ये बिघाड झाल्यास 24X7 सुरु असलेल्या कॉल सेंटरच्या 18001023435 किंवा 18002333435 किंवा 1912 या टोल फ्री क्रमांकावर किंवा महावितरणच्या नजिकच्या कार्यालयात संपर्क साधून तक्रार दाखल करावी. महावितरणकडून संबंधीत एजंसीला ही तक्रार पाठवून सौर कृषिपंपाची दुरुस्ती करण्याची किंवा तो बदलून देण्याची कार्यवाही करण्यात येईल.