पदवी परीक्षेतील ५० टक्के गुणांची अट रद्द करा
नागपूर / अरूण कराळे ( खबरबात)
जिल्हा परिषद मध्ये कार्यरत बी.एड. प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधून केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरण्यासाठी लिंकवर मागविलेल्या माहिती मध्ये सर्व बी. एड. प्रशिक्षित इच्छुक शिक्षकांनी लिंक भरल्यानंतर ५० टक्के गुणांची अट लावून चाळणी केल्याने सेवाजेष्ठ शिक्षकांवर अन्याय होत असून त्याबाबत शिक्षकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
सदर नियमबाह्य प्रक्रियेवर महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेने जिल्हा परिषद सीईओ योगेश कुंभेजकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आक्षेप निवेदन सादर केले.
जिल्ह्यातील १३ पंचायत समिती मधील केंद्रप्रमुखांच्या बहुतेक जागा रिक्त आहेत पण शासन स्तरावरून भरतीची प्रक्रिया गेल्या सहा वर्षांपासून सुरू करण्यात आली नाही.
गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने केंद्रप्रमुखांची पदे भरणे आवश्यक आहे त्याकरीता शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी जिल्ह्यातील ९५ पदे भरण्यासाठी संघटनेच्या सहमतीने पुढाकार घेत तात्पुरती यादी घोषित केली मात्र त्यामध्ये पदवी परीक्षेत ५० टक्के पेक्षा कमी गुण असलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांना डावलण्यात आले आहे. सदर भरती तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येत असल्याने बी.एड.प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधून सेवाजेष्ठते नुसार करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सीईओ योगेश कुंभेजकर यांनी शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना सदर निवेदनावर चर्चा करण्याचे निर्देश दिले.
शिक्षण सभापतींच्या दालनात चर्चा
सदर मुद्द्यावर शिक्षण समिती सभापती भारती पाटील यांच्या दालनात शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांचेशी चर्चा करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे सर्वश्री शरद भांडारकर, मनोज घोडके, नारायण पेठे, राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राजकुमार वैद्य व राज्य शिक्षक परिषदेचे जुगलकिशोर बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
















