नागपूर : अरुण कराळे:
नागपूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या प्राथामिक आरोग्य केंद्र व्याहाड अधिनस्त असलेल्या ग्रामपंचायत दवलामेटी (टोली) येथे आरोग्य विभागाच्या १० आरोग्य सेविका, शिक्षण विभागाचे १३ शिक्षक-शिक्षिका व एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या १० अंगणवाडी सेविका-मदतनीस अशा एकूण ३३ प्रगणकांना मंगळवार २१ एप्रिल रोजी कोविड १९ आपत्ती व्यवस्थापन कंटेन्ट योजनेचे प्रशिक्षण देण्यात आले. समूह साधन केंद्र वाडीचे केंद्रप्रमुख शरद भांडारकर, आरोग्य विभागाच्या आशा पर्यवेक्षिका प्रज्ञा वानखेडे व आयसीडीएस अंगणवाडी पर्यवेक्षिका सुजाता महंत यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व नमुना क्रमांक ३ बाबतीत माहिती समजावून सांगितली.
ग्राम पंचायत दवलामेटी मध्ये ३८४१ कुटुंब असून त्याकरिता एकूण ११ टीम तयार करून प्रत्येक टीम मध्ये आशा वर्कर, शिक्षक व अंगणवाडी सेविका-मदतनीस यांचा समावेश करण्यात आला.
प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्राम विकास अधिकारी विष्णू पोटभरे व मुख्याध्यापक कमलाकर राऊत यांनी मोलाचे सहकार्य केले.