येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला : तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे भागवत शेळके यांच्या शेततळ्यात पडलेल्या हरणाला रोशन शेळके यांच्याकडून जीवनदान देण्यात यश आले. उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ह्या कारणामुळे मुकी प्राणी जंगलं सोडून पाण्याच्या शोधात खेड्यापाड्यांकडे वणवण फिरतांना दिसून येत आहे. मानोरी बुद्रुक परिसरात अशी हरणाची अनेक कळपं बघावयास मिळत असतात.
अशाच एका हरणाच्या कळपातील एक हरीण उन्हाच्या कडाक्यामुळे संध्याकाळच्या वेळेस पाणी पिण्यासाठी शेळके यांच्या शेततळ्यावर आले होते, अंदाज न आल्यामुळे ते शेततळ्यात पडले गेले, तळ्यात तसे पाणी ही कमीच होते पण ते हरीण त्यात बुडू शकले असते. रोशन शेळके हे काही कामानिमित्त शेततळ्यावर गेले असतांना त्यांच्या असे लक्षात आले की एक हरीण तळ्यात पडलेले आहे, तर त्यांनी लगेच घरून दोर आणून दोराच्या साहाय्याने तळ्यात उतरून त्या लहानशा हरणाला तळ्यातील पाण्याबाहेर काढले. एका अर्थाने त्या पाडसाला नवीन जीवनच शेळके यांचे वतीने लाभले. बाहेर काढल्यानंतर शेळके यांनी त्या हरणाला पाणी, दूध वैगेरे पाजले. पाण्याच्या बाहेर निघाल्यानंतर त्या हरणाने सुटकेचा निश्वास सोडला.