चंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाउन करण्यात आले. त्याचा मोठा फटका गोरगरीब मजुरांना बसत आहे. दोन वेळच्या अन्नासाठी त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आहे. या योजनेत समाविष्ट न होऊ शकलेल्या व एपीएल (केशरी), एपीएल शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या शिधापत्रिकाधारकांना मे २०२० ते धान्य वितरित करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अन्नधान्याची गरज लक्षात घेता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना राबविली जात आहे. योजनेत समाविष्ट न होऊ शकलेल्या आणि एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना तसेच शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून प्रति व्यक्ती गहु रुपये ८, तांदुळ १२ रुपये प्रति किलो या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती तीन किलो गहु व २ किलो तांदुळ याप्रमाणे वाटप करावयाचे असते. यासंदर्भात ९ एप्रिल २०२० रोजी शासन निर्णयसुद्धा झालेला आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता या शिधापत्रिका धारकांना माहे मे २०२० चे धान्य येत्या दोन दिवसांत वाटप करण्यात यावे. तसे निर्देश आपल्या स्तरावरून संबंधीत तहसीलदारांना देण्यात यावे, अशे निर्देश खासदार बाळू धानोरकर यांनी दिले आहेत.