बाहेरच्यांना गावबंदी करून कोरोनाविरुध्दच्या लढाईत आदिम कोलामही ताकदीने उतरले
राजुरा, ता.18 : देशातील प्रत्येक नागरीक कोरोना विरुध्द जिकरीने लढा देत असताना, माणिकगड पहाडावरील आदिम कोलामही या लढाईपासून स्वत:ला दूर ठेवू शकलेला नाही. प्रत्येक कोलामगुड्याचा मुख्य रस्ताच बंद करून बाहेरच्या नागरीकांना गावबंदी करण्यात आली. कोलाम विकास फाऊंडेशन जिवनावश्यक सामुग्री घेऊन कोलाम गुड्यावर पोहोचली तेव्हा कोलामांचा हा लढा समोर आला.
चुल पेटली नाही तरी चालेल. पण, आपल्या सरकारचा आदेश मोडायचा नाही असा संकल्प करून कोलामांनी आपल्या पिटूकल्या कोलामगुड्याची शीव करकचून बांधून टाकली. कुठे मोठमोठी सिमेंटची पाईप आडवी टाकण्यात आली. तर कुठे बांबुचे फाटक करकचुन बांधण्यात आले. विशेष म्हणजे राबराब राबून शेतात पिकविलेली तूर थोडी-थोडी विकून आठवडी बाजारातून खरेदी केलेल्या तेल, तिखट,मीठावर कुटूंबाची गुजराण केली जाते. मात्र, गेल्या महीन्याभरात बाहेर निघणेही अशक्य झाल्याने घरातली चुल विझल्यागत झाली. अशा कठीण प्रसंगी आदिम कोलामांच्या मदतीला धावून आली कोलाम विकास फाऊंडेशन. खडकी, रायपूर, कलीगुडा, मारोतीगुडा, लेंडीगुडा, आनंदगुडा, भोक्सापूर, जालीगुडा, सितागुडा, जनकापूर, लचमागुडा, कलगुडी येथिल सुमारे चारशे कोलाम कुटूंबांपर्यत तेल, तिखट, मीठासह आलू, कांदे, हरभरे आणि साबणाचा पुरवठा करण्यात आला. याकामी कोलाम फाऊंडेशनला शेतकरी संघटना, फ्रेंडस् स्पोर्टींग क्लब, वेकोली कर्मचारी व अधिकारी तसेच असंख्य दात्यांनी मदतीचा हात पुढे केला.
माजी आमदार अँड. वामनराव चटप, कोलाम फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे, फ्रेन्डस् स्पोर्टींग क्लबचेे पंढरी बोंडे, माजी समाजकल्याण सभापती निळकंठराव कोरांगे, वेकोली कर्मचारी बिंदूसार गजभिये, जेकब साळवे, अशोक धोडरे, अधिकारी दास, वर्मा व मल्लेश साहेब, नगरसेवक मधूकर चिचोळकर यांचेसह अनेक कार्यकर्ते या कामी परिश्रम करीत आहेत. यानंतरच्या काळात आणखी चारशे कोलाम कुटूंबांपर्यंत मदत पोहोचविण्याचा निर्धार कोलाम फाऊंडेशनने व्यक्त कोला आहे.